सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

बारामती, २३ जानेवारी २०२१: अौद्योगिक विकास महामंडळाच्या दोघा कर्मचाऱयांना शिविगाळ, दमदाटी करत सरकारी कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी बारामतीतील दोघांविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विलास सिताराम धोत्रे (रा. बयाजीनगर, बारामती) व दत्तात्रय बाबुराव मालुसरे (रा. मालुसरेवस्ती, बारामती) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत बाळासाहेब सखाराम जगताप यांनी फिर्याद दिली. दि. २१ जानेवारी रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. जगताप हे अौद्योगिक विकास महामंडळाच्या सरकारी वाहनावर चालक म्हणून काम करतात. पाणी शुद्धीकरणासाठी लागणाऱया लिक्विडचा पुरवठा संताजी कदम यांच्याकडे एमआयडीसीने दिला आहे. कदम यांनाही धोत्रे यांनी यापूर्वी माझ्याकडील चार मजूर कामाला घ्या म्हणून दमदाटी केली होती. याबाबत जगताप यांनी वरिष्ठांना ही बाब सांगा, असे कदम यांना सांगितले होते.
दि.२१ रोजी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता रामचंद्र जोशी यांना प्रांत कार्यालयात बैठकीसाठी जायचे असल्याने जगताप हे सरकारी वाहन तयार करून कार्यालयाच्या व्हरांड्यात सहकारी विष्णू चंद्रभान मिसाळ यांच्यासह थांबले होते. यावेळी धोत्रे व मालुसरे हे दोघे तेथे आले. धोत्रे याने फिर्य़ादीला तुझ्या गावातील लोक ठेकेदाराकडे कामाला लावतो, माझे लोक चालत नाहीत का असे म्हणत शिविगाळ, दमदाटी केली.
यावेळी शिविगाळ एेकून कार्यालयातील अधिकारी व्हरांड्यात जमा झाले. ठेकेदाराला सांगून माझे चार मजूर कामाला लावता येत नाहीत का, तुझे कसे लावतो, असे म्हणत धोत्रे याने अंगावर येत शिविगाळ करत फिर्य़ादीचे गचुरे धरले. तु बाहेर भेट तुला जिवेच मारतो अशी धमकी दिली. विष्णू मिसाळ यांना मालुसरे यांनी तु पथदिव्यांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम नीट करत नाही. नुसताच पगार घेतो असे म्हणत शिविगाळ करत हे दोघे करत असलेल्या सरकारी कामकाजात अडथळा आणला. वरिष्ठांशी चर्चा करून अखेर याप्रकरणी फिर्य़ाद दाखल करण्यात आली.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा