पुणे, २२ जुलै २०२३ : दिग्गज अभिनेते चार्ली चॅप्लिन यांची मुलगी, हॉलिवूड अभिनेत्री जोसेफिन चॅप्लिन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रीचे पॅरिसमध्ये १३ जुलै २०२३ रोजी निधन झाले, परंतु तिच्या कुटुंबीयांनी शुक्रवारी मीडियाला ही दुखद माहिती दिली. २८ मार्च १९४९ रोजी सांता मोनिका, कॅलिफोर्निया येथे जन्मलेल्या जोसेफिन चॅप्लिन ही चार्ली चॅप्लिनची चौथी पत्नी यूजीन ओ’नील यांची मुलगी होती.
यूजीन ओ’नील यांच्या आठ मुलांपैकी जोसेफिन तिसरी होती. माहितीनुसार, चार्ली चॅप्लिन आणि यूजीन ओनील यांचा विवाह १९४२ मध्ये झाला होता. चार्ली चॅप्लिन यांनी लग्न केले तेव्हा ते ५३ वर्षांचे होते, तर यूजीन ओनील या १८ वर्षांच्या होत्या. जोसेफिन चॅप्लिनने तिच्या वडिलांनी दिग्दर्शित आणि लिखित १९५२ लाइमलाइट चित्रपटातून वयाच्या तिसऱ्याव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ज्यामध्ये ‘द कँटरबरी टेल्स’, ‘अ काउंटेस फ्रॉम हाँगकाँग’, ‘विटोरियो डी सिका’, ‘एस्केप टू द सन’, ‘जॅक द रिपर’ आणि ‘लोडर डेस फॉव्स’ सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. जोसेफिन चॅप्लिनने दोन लग्न केले होते. या अभिनेत्रीचे पहिले लग्न बिझनेसमन निक्की सिस्टोवारीसशी झाले होते. घटस्फोट घेतल्यानंतर तिने जीन क्लॉड गार्डिनशी लग्न केले.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड