Chetan Pawar firsth and account Pahalgam attack: स्वर्ग म्हटल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्याच्या केंद्रस्थानी असलेल्या पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये सुदैवाने काही तास आधीच आपल्या कुटुंबासोबत आनंददायी क्षण घालवून आलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे पिंपरी-चिंचवड शहर युवा अधिकारी चेतन पवार यांनी या भयावह घटनेनंतरचा थरकाप उडवणारा अनुभव सांगितला आहे.
चेतन पवार पत्नी आणि दोन मुलांसोबत काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी पवार कुटुंबीयांनी निसर्गरम्य बैसरन व्हॅलीला भेट दिली. त्यानंतर मंगळवारी ते गुलमर्ग येथे पोहोचले. गोंडोलाच्या उंच ठिकाणी कुटुंबासोबत विहंगम दृश्यांचा आनंद घेत असताना अचानक सैनिकांच्या सूचनांनी एकच खळबळ उडाली. ‘तत्काळ खाली उतरा’, या आदेशानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट पसरले. काही वेळातच त्यांना पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाल्याची माहिती मिळाली.
विशेष म्हणजे, ज्या बैसरन व्हॅलीत आदल्या दिवशी त्यांनी मनसोक्त आनंद लुटला होता, त्याच ठिकाणी हा हल्ला झाला होता, हे कळताच त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.”तो क्षण अक्षरशः भयावह होता. काल जिथे आम्ही खेळलो, हसलो, त्याच ठिकाणी आज निष्पाप लोकांचे रक्त सांडले होते,” असे सांगताना चेतन पवार यांच्या आवाजात भीती आणि वेदना स्पष्ट जाणवत होती. सैनिकांनी तात्काळ सर्व पर्यटकांना सुरक्षित स्थळी हलवले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, स्थानिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद पाळला आहे.


चेतन पवार यांनी सांगितले की, स्थानिक नागरिकांनीही त्यांना खूप धीर दिला आणि विमानतळावर जाण्यासाठी वाहनाची सोय केली. सुरक्षा यंत्रणांनी तातडीने बंदोबस्त वाढवला असून, श्रीनगरमध्ये संचारबंदीसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या हल्ल्यामुळे काश्मीरमधील वातावरण किती गंभीर आणि भयावह आहे, याची कल्पना येते, असेही ते म्हणाले.
बैसरन व्हॅलीमध्ये असताना चेतन पवार यांनी काढलेले छायाचित्र त्यांच्या सुटकेनंतर अधिकच महत्त्वाचे ठरले आहे. एका आनंददायी दिवसाच्या आठवणी आता एका दुःस्वप्नात बदलल्या आहेत. या दहशतवादी हल्ल्याने केवळ पर्यटकांनाच नव्हे, तर संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे