स्टिंग ऑपरेशनच्या वादानंतर चेतन शर्मा यांचा राजीनामा !

नवी दिल्ली, १७ फेब्रुवारी २०२३ : स्टिंग ऑपरेशनमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी त्यांचा राजीनामा स्विकारला आहे.

चेतन शर्मा यांनी मंगळवारी एका टीव्ही चॅनलने केलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान त्यांनी निवडसमिती आणि बीसीसीआयमधील पडद्यामागील गुपितं उघड केली. यामध्ये त्यांनी विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि सौरभ गांगुलीबाबत खळबळजनक खुलासे केले होते.

  • काय म्हणाले होते चेतन शर्मा ?

यात शर्मा यांनी दावा केला की, देशातील अव्वल क्रिकेटपटू पूर्णपणे तंदुरुस्त नसताना देखील फिटनेस सिद्ध करण्यासाठी इंजेक्शन घेतात. तसेच अनेक खेळाडू हे ८० ते ८५ टक्केच फिट असताना इंजक्शन्स घेऊन व्यावसायिक क्रिकेटमध्ये लवकरात लवकर परतण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

तर माजी कर्णधार कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यात अहंकाराची लढाई असल्याचा आरोपही चेतन शर्मांनी केला होता.

दरम्यान, चेतन शर्मा यांनी अनेक वादग्रस्त दावे केल्याने बीसीसीआयने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. बोर्डाशी करार असताना, कोणत्याही खेळाडूला किंवा अधिकाऱ्याला कोणत्याही वैयक्तिक विषयावर मीडियामध्ये चर्चा करण्याची परवानगी नसते. मात्र, चेतन यांनी त्याचे उल्लंघन केले. या कारणामुळे त्यांना आता राजीनामा द्यावा लागला आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा