छाबडा हाऊस दहशतवाद्यांच्या टार्गेटवर? दहशतवाद्यांकडे फोटो सापडताच मुंबईतील छाबडा हाऊसबाहेर मोठा बंदोबस्त

मुंबई, ३० जुलै २०२३ : काही दिवसांपूर्वी पुणे एटीएसने दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. या दहशतवाद्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे काही साहित्य सापडले आहे. मात्र, या दोन दहशतवाद्यांकडे मुंबईतील छाबडा हाऊस म्हणजे नरीमन हाऊसच्या गुगल इमेज सापडल्या आहेत. २६/११चा मुंबईवर हल्ला झाला होता. तेव्हा याच छाबडा हाऊसमध्ये दहशतवादी घुसले होते. आता या दहशतवाद्यांकडे छाबडा हाऊसचे फोटो सापडल्याने पोलीस अलर्ट झाले आहेत. या छाबडा हाऊसभोवती बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

पुणे एटीएसने दोन दहशतवादी तरुणांना अटक केली होती. या दोघांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडे कुलाबा येथील छाबडा हाऊसची गुगल इमेज मिळालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छाबडा हाऊस दहशतवाद्यांच्या टार्गेटवर आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय? त्यामुळे मुंबई पोलिसांकडून छाबडा हाऊसची सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देखील छाबडा हाऊस हे दहशतवाद्यांचे टार्गेट होते. आता मुंबई पोलिसांनी खबरदारी घेत या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे.

पोलिसांना या दोन दहशतवाद्याकंडे काही उपकरणे सापडली आहे. तसेच ड्रोन बनवण्याचे साहित्यही सापडले आहे. ड्रोनद्वारे या दहशतवाद्यांना छाबडा हाऊस टार्गेट करायचे तर नव्हते ना? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतोय. छाबडा हाऊस बाहेर पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या ठिकाणी वरिष्ठ पोलीस अधिकारी वारंवार येऊन पाहणी करत आहेत. या ठिकाणी चार सीनिअर पीआय आणि एक एपीआय नजर ठेवून आहेत. तसेच बॉम्ब निकामी पथकाची गाडीही या परिसरात तैनात करण्यात आली आहे. तसेच स्थानिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, महाराष्ट्रातील इसीसचे मॉड्युल उद्धवस्त करण्यासाठी एमआयएने कडक कारवाईला सुरुवात केली आहे, याप्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये पुण्यातील डॉ.अदनानअली सरकारचा समावेश आहे. इसीसची पाळेमुळे महाराष्ट्रात रुजवण्याचा प्रयन्त होता, मात्र एनआयएच्या कारवाईने तो प्रयत्न अयशस्वी झाला आहे.

एनआयएने महाराष्ट्र मॉड्यूलप्रकरणी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून यापूर्वी ताबिश नासीर सिद्दीकी, जुबेर नूर महंमद शेख अबू नुसैबा, शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला यांना अटक केली आहे. एनआयए कोठडीत त्यांची चौकशी करण्यात आली तेव्हा डॉ.अदनानअली सरकार आयएसच्या दहशतवादी विचारधारेच्या प्रसारात सामील असल्याची माहिती मिळाली. तो तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील करून घेण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून काम करत होता. डॉ.अदनानअली सरकार याला पुण्यातील कोंढवा भागातून एनआयएने अटक केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा