छत्रपती राजश्री शाहू महाराज

शाहूंचा जन्म हा कागलचे जयसिंगराव उर्फ आबासाहेब घाडगे व आई राधाबाई यांच्या पोटी ८ जून १८७४ ला कागल येथे झाला, त्यांचे मूळ नाव यशवंतराव होते, कोल्हापूर संस्थानचे चौथे राजे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च १९८४ ला यशवंतरावांना दत्तक घेऊन यशवंतरावांचे नामकरण “शाहू” हे केले.

सन १८८९ ते १८९१ ला हे शिक्षणासाठी धारवाड येथे असताना शिक्षण चालू असतानाच १ एप्रिल १८९१ ला बडोद्याचे गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या मुलीशी विवाह वयाच्या १७ सतराव्या वर्षी लावून दिला, १८९३ ला शिक्षण संपताच २ एप्रिल १८९४ ला त्यांचा राज्यारोहण झाला.

कोल्हापूर संस्थांची सूत्रे हातात येताच बारकाईने संस्थानाचा अभ्यास करण्यास सुरुवात करून लहान वयातच राजे राज्यकारभार पाहू लागले. महाराजांनी शिक्षणाचे महत्त्व जाणले होते, महाराज म्हणता की जोपर्यंत बहुजन समाज शिक्षण घेऊन सुशिक्षित होणार नाही तोपर्यंत कोणतेही सामाजिक बदल होणार नाहीत. त्यामुळे संस्थाना देशात पहिल्यांदा प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे केले, जिथे शक्य आहे तिथे राजांनी शाळा काढल्या, संस्थानात जे पालक मुलांना शाळेत पाठवणार नाहीत त्यांना त्यावेळी १रुपये दंडाची शिक्षेची तरतूद केली होती.

जातीयतेची दरी कमी होण्यासाठी सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगवेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद करून एकत्र शाळा भरवण्याची पद्धत चालू केली. संस्थानात त्यावेळी महाराजांनी प्राथमिक,माध्यमिक, पुरोहित, सरदार, पाटील, उद्योग, संस्कृत, सत्यशोधक, सैनिकी बालवारे, डोंबाऱ्याच्या मुलांची कला इत्यादी शाळा संस्थानात चालू केल्या. संस्थानात येणाऱ्या बाहेरील विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून जात निहाय महाराजांनी बोर्डिंग चालू केले, जास्तीत जास्त शिक्षणाचा प्रसार व्हावा यांचे काटेकोर प्रयत्न महाराज करत, मुलींनी शिक्षणात कुठे कमी पडू नये असे त्यांना वाटत असे, दलित समाजाने शिक्षण देऊन मुख्य प्रवाहात यावे असे नियमित व्याख्यानात बोलत. दलित समाजाने शिक्षण घेतल्यानंतर नोकरी, काम उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होणार याची पूर्ण कल्पना असतानाही महाराजांनी क्रांतिकारक निर्णय उच्चवर्णीय पुढाऱ्यांचा आक्रमक विरोध डावलून देशात पहिल्यांदा ६ जुलै १९०२ ला कोल्हापूर संस्थानात मागास जातींना ५० टक्के आरक्षण जाहीर करून कायदा संमत करून घेतला.मागास जातींना शाळा, दवाखाने, पाणवठे, सार्वजनिक विहिरी येथे समानतेने वागण्याचे आदेश जारी केले.

ज्या जातीवर ब्रिटिशांनी गुन्हेगार हा शिक्का मारला होता, त्यांना रोज हजेरी द्यावे लागे, संस्थानात हजेरी पद्धत बंद करून या समाजातील लोकांना संस्थानात पहारेकरी,अंगरक्षक, रखवालदार अशा कायमस्वरूपी नोकर्‍या दिल्या. ज्यावेळी महिलांना घराबाहेर पडणेही बंधनकारक होते त्यावेळी १९१७ साली महाराजांनी विधवा पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. देवदासी प्रथा कायद्याने बंद केली. जोगत्या-मुरळी प्रतिबंधक कायदा केला. आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहास कायदेशीर मान्यता दिले व त्याची सुरुवात आपल्या घरातूनच केली, आपल्या चुलत बहिणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लावून दिले.संस्थानात बऱ्याच मराठा-धनगर विवाह सोहळ्यात पुढाकार घेऊन विवाह घडवून आणले, शाहूमहाराज स्वतःपासूनच अंमलबजावणी करत.अस्पृश्य समाजाला समानतेची वागणूक मिळावी हा कायदा करून राजे थांबले नाही, तर अस्पृश्य समाजातील गंगाराम कांबळे याला हॉटेल काढून देऊन राजे स्वतः हॉटेलमध्ये आपल्या लवाजम्यासह हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी जात असत.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ मे १९२० ला मूकनायक प्रकाशित केले पण कालांतराने आर्थिक अडचणीमुळे बंद पडले. ज्यावेळी ही गोष्ट महाराजांच्या पर्यंत पोहोचली त्यावेळी मूकनायक ला आर्थिक मदत केली.माणगाव मध्ये भरलेल्या देशातील पहिल्या अस्पृश्य परिषदेमध्ये प्रमुख या नात्याने बोलताना म्हणाले होते की, दलित समाजाने डॉ आंबेडकरांना पाहून आपला नेता शोधला आहे व हेच आंबेडकर देशातील दलितांचे नेतृत्व करतील अशी भविष्यवाणी केली. कालांतराने ती खरी ठरली इतक्या दूरदृष्टीचे राजे होते.

राजे ज्यावेळी परदेश दौर्‍यात जात असत, त्यावेळी तिथल्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्या आपल्या संस्थानातअसाव्यात असा प्रयत्न करत, त्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे इंग्लंडमध्ये त्यांनी धारण पाहिले, त्यावेळी संस्थानची धरण असावे म्हणून, कोल्हापुरात दुष्काळ पडला असताना राधानगरी धरणाचे बांधकाम हाती घेऊन ते पूर्ण केले.अशा असंख्य कामामुळे महाराजांचे नाव पूर्ण देश व परदेशातही झाले होते, अशा या राजाला कानपूरच्या कुर्मी क्षत्रिय समाजाने “राजर्षी “ही उपाधी दिली होती. महाराज जवळपास २८वर्षे कोल्हापूर संस्थानचे राजे होते. चित्रकला, कुस्ती, चित्रपट, संगीत, नाटक यांना महाराजांनी राज आश्रय दिला. गोरगरीब, दलित, बहुजन समाज यांच्यासाठी आयुष्यभर झटणाऱ्या राजांनी ६ मे १९२२ ला अखेरचा श्वास मुंबईत घेतला.
त्यांच्या पवित्र स्मृतीस कृतज्ञता पूर्वक विनम्र अभिवादन…

  – अशोक कांबळे 

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा