तुळापूर, दि. ११ मे २०२०: ज्यांच्या पराक्रमालाच नव्हे तर बलिदानाला देखील जगाच्या इतिहात तोड नाही ते म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज.
महाराष्ट्रातील तमाम शिव-शंभु भक्त आतुरतेने ज्या क्षणाची वाट पाहत असतात , तो क्षण अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपला आहे.
राष्ट्रवीर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती (१४ मे) सालाबादप्रमाणे मोठ्याने साजरी होऊ शकत नाही. कारण आज देशावर कोरोना सारखा बलाढ्य शत्रूचे आक्रमण झाले असून दिवसें दिवस झपाट्याने कोरोना रुग्णात वाढ होत आहे.
राष्ट्र हितासाठी शासनाच्या नियमांचे पालन करून, यंदाचा शंभुजन्मोत्सव सोहळा घरीच साजरा करूया. संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करावे, शंभुचरित्र वाचावे, त्यांचे विचार आत्मसात करावे, अवघ्या ३२ वर्षात त्यांनी केलेले कार्य कर्तृत्व धर्मकारण राजकारण समाजकारण न्यायव्यवस्था, शासन प्रशासन शेतकऱ्यां विषयीचा दृष्टिकोन, स्त्रियांना दिलेले स्वातंत्र्य, साहित्यिक, युद्ध अशा अनेक वेगवेगळ्या विषयांवर लेख लिहून गौरशाली इतिहास सोशल मीडिया वर प्रसारित करावे व त्यांच्या चरित्रावर प्रकाश टाकून खऱ्या अर्थाने मानवंदना देऊया.
ह्या लॉकडाउनच्या काळात महापुरुषांच्या जयंत्या नाचून नाही तर वाचून साजऱ्या कराव्या असे भावनिक आव्हान “न्यूज अनकट” शी बोलताना मा.अध्यक्ष जिल्हा परिषद (पुणे) व श्री. शंभुराज्याभिषेक ट्रस्ट चे अध्यक्ष प्रदिपदादा कंद तसेच कार्यध्यक्ष रामकृष्ण सातव पाटील यांनी केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी- ज्ञानेश्वर शिंदे