रायगड, २९ सप्टेंबर २०२०: छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे. यात ते आपल्या चारचाकी गाडीच्या बोनटवर जेवणाची थाळी ठेवून उभ्यानेच जेवण करताना दिसतायत. आणि जेवणाच्या ताटात पदार्थ कोणते? तर कांदा, चटणी आणि भाकर. छत्रपती असनूही राजेंचा हा साधेपणा त्यांच्या कार्यकर्त्यांना भुरळ घालतो.
आपल्या फेसबुक पोस्टमध्ये संभाजीराजे म्हणतात की,
”कार्यकर्त्याने आणून दिलेल्या कांदा आणि चटणी भाकरीच्या चवीची सर दुसऱ्या कोणत्याही पदार्थाला नाही. आज रायगड किल्ल्याच्या कामांची पाहणी करून खाली यायला दुपार उलटली होती. सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं. रस्त्याच्या कडेला गाडी लावून जेवण करायला संध्याकाळ चे 4:30 वाजले होते. पोटभर जेवण करून, पुन्हा मुंबईला महत्वाच्या बैठकीकरीता निघालो आहे.
छत्रपतींना स्वतः पेक्षा समाज महत्वाचा असतो
दिल्लीतून निघून, नाशिकमधील राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाची बैठक संपवून दुसऱ्या दिवशी रायगडला आलो. गेल्या वीस- पंचवीस दिवसांपासून कोल्हापूरला राजवाड्यावर गेलो नाही. रायगडवरून कोल्हापूरला निघालो होतो. अर्ध्या रस्त्यात असतानाच फोन आला की राजे आपण मुंबईला जाणं अत्यंत महत्वाचे आहे. मला घरी जाणं सुद्धा महत्त्वाचं होतं. पण मी तो पर्याय टाळला आणि मुंबईला जाण्यासाठी निघालो. समाजाच्या भवितव्याचा प्रश्न असल्याने मला जाणं भाग आहे. छत्रपतींना स्वतः पेक्षा समाज महत्वाचा असतो.” – खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे