छत्रपती संभाजीनगरात पोलिस पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या; पती व भावाला अटक

छत्रपती संभाजीनगरात पोलिस पतीच्या छळाला कंटाळून एका महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच रात्रीतून दोघांना अटक करण्यात आली.

ANC छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयातील पोलिस वसाहतीत राहणारा पोलिस अंमलदार समीर मुस्ताक शेख याची पत्नी सबा समीर शेख यांनी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी समीरसह त्याची आई आणि दोन भावांवर कौटुंबिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर रात्रीतून पोलिस अंमलदार समीर व त्याचा भाऊ शाहरुख शेख यांना अटक करण्यात आली. शाहरुख परभणी येथे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

न्यायालयाने अटक करण्यात आलेल्या समीर आणि शाहरुख शेख यांना ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. २०१९ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर सबा यांचा २०२१ मध्ये मूळ कन्नडचे रहिवासी असलेल्या समीरसोबत विवाह झाला होता. हुंडा म्हणून दोन लाख रुपये ठरवण्यात आले होते. लग्नावेळी समीरला ५० हजार रुपये देऊन उर्वरित रक्कम नंतर देण्याचे ठरले होते.

लग्नानंतर सबा पती, सासू आणि दिरासोबत पोलिस वसाहतीत राहात होती. मात्र, आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने माहेरकडून दीड लाख रुपये देऊ शकले नाही. यामुळे सततचा छळ सुरू झाला. त्यामुळे सबा माहेरी राहण्यास गेली होती, परंतु कुटुंबाच्या मध्यस्थीने ती पुन्हा समीरकडे राहण्यास आली. तरीदेखील छळ सुरूच राहिला. त्याला कंटाळून तणावाखाली सबा यांनी गुरुवारी आत्महत्या केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी रात्रीतून तातडीची कारवाई करत दोघांना अटक केली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी संजय आहेर