दुबईत संपन्न झाली छत्रपतींची दुर्ग मोहीम, लहान मुलांना एकत्र घेऊन साकारण्यात आली प्रतापगडाची प्रतिकृती

पुणे २० नोव्हेंबर २०२३ : दिवाळीचा सण म्हणजे फराळ, फटाके, आकाश कंदील आणि आप्तजनांच्या भेटीगाठींचा काळ, दिवाळीत महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला (दुर्ग) बनवण्याची सुद्धा एक प्रथा आहे. पण आजकालच्या काळात ही प्रथा लुप्त होताना दिसत आहे. मात्र दुबईमध्ये स्थित असलेल्या प्रथा या संस्थेने एक क्रांतिकारी उपक्रम राबवला. १९ नोव्हेंबर २०२३ रोजी, ममझार पार्क दुबई मध्ये प्रथा या संस्थेने प्रथा दुर्ग मोहीम वर्कशॉप केला. दुबईत स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीय कुटुंबियांच्या मुलांना एकत्रित आणून या वर्कशॉपच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास व त्यांच्या गडकिल्ल्यांविषयी माहिती ह्या बालमित्रांना देण्यात आली. यंदाचे हे प्रथा दुर्ग मोहीमचे पहिलेच वर्ष असून, प्रथा संस्थेने प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती बनवण्याचे ठरवले.

सॉलिटेअर इव्हेंट्स या कंपनीने कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी उत्तम रित्या सांभाळली. या कार्यक्रमाला मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी दुबईत हजेरी लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवली. सोनालीने लहान मुलांचे भरभरुन कौतुक केले व त्यांना प्रोत्साहन दिले. यंदाचे वर्ष हे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे ३५० वे वर्ष म्हणून ओळखले जात असून या कार्यक्रमाला जमलेल्या सर्व प्रेक्षकांनी ३५० दिवे लावून छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली. यामध्ये सोनाली कुलकर्णी यांचाही सहभाग होता.

प्रथा संस्थेचे संस्थापक सागर पाटील व त्यांच्याच त्रिविक्रम ढोल ताशा पथकातल्या सवंगड्यांना घेऊन त्यांनी ही आगळीवेगळी दुर्ग मोहीम राबवली. एक दिवस रंगलेल्या ह्या वर्कशॉप ची सुरुवात भूमिपूजनाने झाली, त्यानंतर किल्ल्याची आखणी व किल्याचे बांधकाम याचे प्रशिक्षण लहान मुलांना देण्यात आले. मातीचे मिश्रण करून त्याचा लेप किल्ल्याला लावण्यात आला. व अशा प्रकारे हुबेहूब प्रतापगडाची प्रतिकृती साकारण्यात आली. दुबईमध्ये लहान मुलांसाठी पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आला व त्यामुळे प्रथा या संस्थेचे कौतुक पालकांनी भरभरून केले.

५ मीटर लांबी व ३ मीटर रुंदी असलेली ही प्रतापगडची प्रतिकृती बनवायला साधारण आठ तास लागले. सुमारे ५० गोणी दगड व १ टन माती वापरण्यात आली असे प्रथा संस्थेचे संचालक सागर पाटील यांनी सांगितले. या मोहिमेमध्ये ३० लहान मुलांनी सहभाग घेतला. संपूर्ण आखाती देशातील पहिले म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्रिविक्रम ढोल ताशा पथकाच्या तरुण वादकांनी यात स्वयंसेवक म्हणून दुर्ग बांधायला व लहान मुलांना ही प्रथा शिकवायला हातभार लावला. त्या मध्ये भूषण तिगोटे, प्रसाद कुंभार, वर्धन सोहनी, ईशान अत्रे, प्रियांका पाटील, अंकिता पाटील, सोनाली जोशी, श्रद्धा कांबळे, गौरव साठे, हर्षला देसाई, फाल्गुनी भिंगारकर, समाधान कदम, वैभव पुजारी यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चैत्राली पंकज यांनी केले.

या मोहिमेला पालकांनी व लहान मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला व अशा प्रकारचे उपक्रम वारंवार व्हावे अशी इच्छा दर्शवली. “परदेशात राहणाऱ्या मराठी कुटुंबांना आपल्या मातीशी जोडण्याचे कार्य आम्ही प्रथा या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत” असे सागर पाटील यांनी सांगितले.

न्युज अनकट प्रतिनिधी : सुरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा