छत्तीसगड : २२ वर्षीय सोशल मीडिया स्टार लीना नागवंशीची आत्महत्या

रायपुर, २८ डिसेंबर २०२२ : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येनंतर, आता आणखी एका मृत्यूची बातमी समोर येत आहे. छत्तीसगडच्या रायगड येथील रहिवासी असलेल्या २२ वर्षीय सोशल मीडिया स्टार लीना नागवंशीने आत्महत्या केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगड जिल्हातील विहार कॉलनीमध्ये राहणाऱ्या लीनाने घरातच गळफास घेत जीवन संपवले. २६ डिसेंबरला लीना दुपारी आपल्या आईबरोबर बाजारात गेली होती. बाजारातून घरी परतल्यावर लीना रुममध्ये नसल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. लीनाला पाहण्यासाठी तिची आई घराच्या गच्चीवर गेली असता दरवाजा बाहेरुन बंद दिसला. बराच वेळ आवाज देऊनही दरवाजा न उघडल्याने कुटुंबियांनी गच्चीचा दरवाजा तोडला. तेव्हा गच्चीवरील एका पाईपाला गळफास घेत लीनाने आत्महत्या केल्याचे आढळले.

दरम्यान, लीनाच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. लीनाचा मृतदेह शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येपूर्वी लीनाने कोणतीही चिठ्ठी लिहिलेली नाही. त्यामुळे लीनाच्या आत्महत्येचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

  • इन्स्टाग्राम १० हजाराहून अधिक फॉलोवर्स

लीना सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय होती. रील्स व व्हिडीओमधून तिला लोकप्रियता मिळाली होती. तिचे इन्स्टाग्राम १० हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत. लीना तिचे आई-वडील व भावांबरोबर छत्तीसगडमधील विहार कॉलनीत राहत होती.

  • दोन दिवसांपूर्वी पोस्ट केला होता व्हिडिओ

लीनाने दोन दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये टेडी बेअरसोबत खेळताना दिसत आहे आणि पुढच्याच क्षणात ती सांताच्या लूकमध्ये दिसत आहे आणि तिच्या हातात असलेला टेडी बेअर लहान मुलामध्ये बदलतो. यापूर्वी एका व्हिडिओमध्ये सांताचा ड्रेस परिधान करून लीनाने तिच्या चाहत्यांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या होत्या. या व्हिडीओमध्ये ती खूपच आनंदी दिसत आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : प्रज्ञा फाटक.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा