मुंबई, ४ जानेवारी २०२१: खंडणी प्रकरणी मुंबईतील सीबीआयच्या विशेष कोर्टाने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याला दोषी ठरवत २ वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. २०१५ मध्ये छोटा राजनवर नंदू वाजेकर नावाच्या बिल्डरला धमकावण्याचा आणि त्याच्याकडून खंडणीच्या पैशांची २६ कोटींची मागणी केल्याचा आरोप होता. या प्रकरणात त्याला दोषी ठरविण्यात आले आहे.
सोमवारी मुंबई सीबीआय न्यायालयात सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर, कुख्यात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार छोटा राजन याला नवी मुंबईतील पनवेलमधील बिल्डर नंदू वाजेकर यांच्याकडून खंडणी मागण्यासाठी दोषी ठरविण्यात आले. राजन यांच्यासह अन्य ३ आरोपींनाही या प्रकरणात दोषी ठरविण्यात आले आहे.
या प्रकरणात छोटा राजन वर आरोप होता की त्याने आपल्या गुंडांना पनवेलचे बांधकाम व्यावसायिक नंदू वाजेकर यांच्या कार्यालयात पाठवले होते. त्यांनी तेथे छोटा राजनच्या सांगण्यावरून बिल्डरला धमकावले होते आणि वाजेकर यांच्याकडे २६ कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. पैसे न दिल्याने वाजेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
या घटनेने नाराज झाल्याने बिल्डर नंदू यांनी पनवेल पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. छोटा राजन व्यतिरिक्त सुरेश शिंदे, लक्ष्मण निकम उर्फ दादया सुमित आणि विजय मात्रे हेही या प्रकरणात आरोपी होते. मात्र, या प्रकरणातील आरोपी ठक्कर अद्याप फरार आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे