आज सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती व्यंकटनारायणआणि न्यायमूर्ती भुईया यांना दिली शपथ

नवी दिल्ली, १४ जुलै २०२३ : सरन्यायाधीश डी.वाय.चंद्रचूड यांनी न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया आणि न्यायमूर्ती एस. व्यंकटनारायण भाटी यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ दिली. यासह आता सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह एकूण न्यायाधीशांची संख्या ३२ झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयात एकूण ३४ न्यायाधीशांची नियुक्ती केली जाऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात झालेल्या शपथविधी समारंभात सरन्यायाधीशांनी दोन नवीन न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. १२ जुलै रोजी केंद्र सरकारने न्यायमूर्ती भुईया आणि न्यायमूर्ती भाटी यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यास मान्यता दिली होती.

न्यायमूर्ती भुईया हे तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते आणि न्यायमूर्ती भाटी हे केरळ उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते. न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया आणि न्यायमूर्ती भाटी यांच्या नियुक्तीची घोषणा कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी बुधवारी केलेली. सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने ५ जुलै रोजी, त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली होती.

न्यायमूर्ती भुईया यांचा जन्म २ ऑगस्ट १९६४ रोजी झाला. १७ ऑक्टोबर २०११ रोजी त्यांची गुवाहाटी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि ते उच्च न्यायालयाचे (गुवाहाटी) सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश होते. ते २८ जून २०२२ पासून तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. न्यायमूर्ती भाटी यांचा जन्म ६ मे १९६२ रोजी झाला. १२ एप्रिल २०१३ रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. आंध्र प्रदेशच्या उच्च न्यायालयात ते सर्वात ज्येष्ठ होते. न्यायमूर्ती भाटी यांची मार्च २०१९ मध्ये केरळ उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती आणि ते १ जून २०२३ पासून मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा