गोल पोस्ट महाराष्ट्र मुंबई मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, १७ एप्रिल २०२१: नुकतेच हवामान खात्याने यंदाचा मान्सून सामान्य राहणार असल्याचे घोषित केले. गेल्या अनेक वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ९६ ते १०४ टक्के पाऊस होईल असं अनुमान आहे. अशा स्थितीत पावसाळ्यात कोरूनाकोरोना चा प्रादुर्भाव आणखीन पसरण्याची शक्यता देखील आहे. हे पाहता काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मान्सूनपूर्व कामांचा आढावा ऑनलाइन बैठकीतून घेतला. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी मान्सूनपूर्व कामांवर त्याचा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी आणि नालेसफाईसह साथरोग नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. तसेच नियोजनानुसार सर्व कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिल्या.

या बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले की, मुंबईतील नालेसफाई करतानाच आवश्यक त्या ठिकाणी नाले खोलीकरण अथवा रुंदीकरण करुन त्यांची नैसर्गिक प्रवाह क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळे पावसाळी पाण्याचा निचरा वेगाने होऊ शकेल. तसेच महामार्ग आणि पदपथाच्या बाजूला टाकण्यात आलेले डेब्रिज उचलून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी डेब्रिज टाकणाऱ्यांना सूचना द्यावी. चुकीच्या पद्धतीने डेब्रिज टाकणाऱ्यांना ताकीद देण्यात यावी. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु आहे. पावसाळा सुरु झाल्यानंतर मलेरिया, डेंगीची शक्यता वाढते. त्यांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. ही सर्व मान्सूनपूर्व तयारीची कामे नियोजनानुसार ३१ मे पूर्वी पूर्ण करावीत, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत सुरु असलेल्या कोस्टल रोड, मेट्रो अशा कामांच्या परिसरात साचत असलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी महापालिकेने संबधित यंत्रणांशी समन्वय साधून उपाययोजना करावी, अशी सूचना केली.

मुंबई महानगरपालिका आयुक्त श्री. चहल म्हणाले की, मुंबईमध्ये २०२० मध्ये सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत तब्बल ६४ टक्के अधिक पाऊस नोंदवला गेला. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या निर्देशानुसार, पावसाळापूर्व नालेसफाई व गाळ काढण्याच्या कामांची सुरुवात ऑक्टोबर २०२० मध्येच करण्यात आली. परिणामी प्रशासकीय कार्यवाही व निविदा आदी प्रक्रिया लवकर पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामे लवकर सुरु झाली. तसेच मुंबईत पावसाचे पाणी साठण्याची संभाव्य अशी ४०६ ठिकाणे शोधून तेथील आवश्यक कामे सुरु करण्यात आली आहेत. मुंबईतील ३० वर्षांपेक्षा अधिक जुन्या व राहण्यास धोकादायक असलेल्या इमारतींना नोटिसा देणे, धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी स्थलांतर करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजवणे आदी कामांना प्रारंभ करण्यात आल्याचेही श्री. चहल यांनी सांगितले.

यावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे, संजीव जयस्वाल, पी. वेलारासू, सुरेश काकाणी आदी सहभागी झाले होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

error: Content is protected !!
Exit mobile version