मुंबई, १३ ऑक्टोबर २०२०: राज्यातील मंदिरे उघडण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत त्यांच्यावर टीका केली होती. राज्यातील मंदिरे का उघडली जात नाहीत? आपण हिंदुत्व सोडून सेक्युलर झालात का? असा तिखट सवाल देखील आपल्या पत्रामधून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. आता त्यालाच उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी देखील राज्यपालांना पत्र पाठवत माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नसल्याचं म्हंटल आहे.
राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मंदिरे उघडण्याबाबतीत त्यांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केला होता, त्याला पत्र लिहून मुख्यमंत्री म्हणाले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, सध्या राज्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी‘ ही मोहीम राबवली जात आहे. आरोग्यविषयी सूचना देणे , जनजागृती करणे, आरोग्य तपासणी करणे, आवश्यकतेनुसार चाचणी आणि उपचार करणे हे सर्व आपल्या राज्यातील डॅाक्टर्स, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, आंगणवाडी सेविका नागरिकांच्या घरोघरी जाऊन करत आहेत. याची आपल्याला कल्पना असेलच. कदाचित असा प्रयत्न करणारे महाराष्ट्र हे एकमेव अथवा पहिले राज्य असे सुनावले आहे.
तसेच या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. असे उद्धव ठाकरे यांनी कोश्यारी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी – अमोल यादव