Farmers protest Chikhali TP scheme cancellation demand: महापालिकेच्या प्रस्तावित चिखली नगररचना योजनेविरोधात कुदळवाडीतील नागरिक आणि शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. ५) एकजूट दाखवत प्रशासनाच्या निषेधार्थ जोरदार आंदोलन केले. ‘रद्द करा, रद्द करा… टीपी स्कीम रद्द करा…’ या घोषणांनी परिसर दणाणून गेला. संतप्त नागरिकांनी योजनेच्या जाहीर प्रकटनाची होळी करून आपला तीव्र विरोध दर्शविला.
यापूर्वी, महापालिकेने बांगलादेशी रोहिंग्यांचे कारण पुढे करत कुदळवाडीतील सुमारे ८२५ एकर जागेवरील अनधिकृत बांधकामे आणि शेड जमीनदोस्त केले होते. या कारवाईमुळे जवळपास सव्वाचार हजार उद्योजक उद्ध्वस्त झाले आणि अनेक शेतकरी भूमिहीन झाले. आता याच भागाचा समावेश नवीन नगररचना योजनेत केल्याने नागरिकांमध्ये असंतोषाची तीव्र लाट उसळली आहे.
सोमवारी सकाळी चिखली परिसरात नागरिक आणि शेतकरी मोठ्या संख्येने एकत्र आले. तात्यासाहेब सपकाळ, जितेंद्र यादव, बाळासाहेब मोरे, उदयसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात दिनेश यादव, युवराज पवार, संभाजी बालगरे, दिलीप यादव, रामभाऊ कोळकर, किसन यादव, बाळासाहेब यादव यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते.
यावेळी बोलताना जितेंद्र यादव म्हणाले की, “स्थानिक शेतकऱ्यांच्या या लढ्यात सर्वपक्षीय नागरिकांनी एकत्र येण्याची गरज आहे. ज्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला नाही, त्यांचा या योजनेला पाठिंबा आहे, असे समजले जाईल. हा चिखलीकरांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.”
उद्योजकांचे मोठे नुकसान झाले असल्याचे सांगताना तात्यासाहेब सपकाळ म्हणाले, “महापालिकेच्या कारवाईत येथील उद्योजकांचे मोठे नुकसान झाले आहे. विकासाचा समतोल राखणे आवश्यक आहे. पुढील धोरण ठरवण्यासाठी लवकरच बैठका घेऊन जनजागृती केली जाईल.”
महापालिका प्रशासनाने नागरिकांना विश्वासात न घेताच ही योजना लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी किशोर बालघरे, चिमण बालघरे, विशाल नेवाळे, दत्तू नाना मोरे, संभाजी यादव, बाळासाहेब हरगुडे, गणेश यादव, मनोज मोरे, नीलेश मोरे, उत्तम बालघरे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या जाहीर प्रकटनाची होळी केली. या आंदोलनामुळे चिखली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे