बेंबळेत कोरोनाच्या थैमानात चिकनगुनिया सदृश्य आजाराची भर; ग्रामस्थांतून डास प्रतिबंधात्मक फवारणीची मागणी

माढा, ९ नोव्हेंबर २०२०: एकीकडे कोरोना आजाराने थैमान घातले असताना, बेंबळे येथे चिकनगुनिया सदृश्य आजार वेगाने पसरण्यास सुरूवात झाली आहे. वाड्या-वस्त्यांसह गावामध्ये या आजाराचे रूग्ण आढळू लागले आहेत. गंभीर बाब म्हणजे या रूग्णांना तपासण्यासाठी पुरेशी वैद्यकिय व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे बेंबळेकर ग्रामस्थ पुरते हैराण झाले आहेत.

सद्यस्थितीला आरोग्य व्यवस्थेचे संपूर्ण लक्ष कोरोना नियंत्रणाकडे लागलेले आहे. अशावेळी साथीच्या या गंभीर आजाराने ग्रासलेल्या रूग्णांची अवस्था मात्र बिकट झाली आहे. शहर ठिकाणी रूग्णालयांना कोवीड सुविधा उपलब्ध केली आहे. तेथे अन्य तपासण्या जवळपास थांबल्या आहेत. त्यामुळे तज्ञांकडून उपचार करून घ्यावेत, अशी काही परिस्थिती सध्या राहिली नाही. प्रचंड अंगदुखी, थांबून थांबून ताप येणे अशा लक्षणांनी बेंबळेकर नागरीक बेजार आहेत.

ग्रामपंचायतीकडून डास प्रतिबंधात्मक फवारणीची मागणी

गेल्या काही दिवसामध्ये बेंबळे गावाला पुराच्या पाण्याने विळखा घातला होता. यामुळे गावासभोवतालची शेतात पाणी साठून पिके नासून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पती होवून डासांचा शिरकाव गावात झाल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव मोठा दिसून येत आहे. यामुळे चिकनगुनिया सदृश्य साथ गावामध्ये पसरली आहे. या परिस्थितीत डास नियंत्रणासाठी ग्रामपंचायत पातळीवर प्रयत्न करण्याची गरज आहे. प्रयत्न युद्धपातळीवर झाले पाहिजे. डासांमुळे होणाऱ्या आजारांचे गांभीर्य विचारात घेता आरोग्य खाते व ग्रामपंचायत यांनी जातीने लक्ष देऊन त्वरीत प्रतिबंधात्मक औषध फवारणी करावी. तसेच मेडीक्लोरची व्यवस्था करून नळामधून येणाऱ्या पाण्यात ब्लिचिंग पावडरचा वापर करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

बेंबळे गावामध्ये सध्यस्थितीला दररोज चार ते पाच रूग्ण चिकनगुनिया सदृश्य लक्षणे असलेली येत आहेत. ग्रामस्थांनी रात्री झोपताना मच्छरदानीचा वापर करावा. तसेच घराचा परीसर स्वच्छ ठेवला पाहीजे.
– डॉ. योगेश घोगरे, बेंबळे.

बेंबळे येथे परीते उपकेंद्राचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी भेट घेवून परीस्थितीचा अढावा घेतला आहे. डास प्रतिबंधात्मक फवारणी त्वरीत घेतली जाणार आहे.  किशोर कदम – सरपंच प्रतिनीधी, बेंबळे

न्यूज अनकट प्रतिनिधी- प्रदीप पाटील

3 प्रतिक्रिया

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा