राजौरी (जम्मू आणि काश्मीर), २ जानेवारी २०२३ : आज सोमवारी सकाळी राजौरीच्या वरच्या डांगरी गावात झालेल्या ‘आयईडी’च्या (इम्प्रोव्हाइज्ड एक्स्प्लोसिव्ह डिव्हाइस) स्फोटात एक बालक ठार आणि पाचजण जखमी झाले आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले, की घराजवळ हा स्फोट झाला जेथे रविवारी गोळीबाराच्या घटनेत दहशतवाद्यांनी चार नागरिक मारले.
एडीजीपी मुकेश सिंग यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले, ” पहिल्या दिवशी गोळीबार झाला त्याच घराजवळ स्फोट झाला आहे. यात पाचजण जखमी झाले असून, एका मुलाचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्याची प्रकृती गंभीर आहे.” या परिसरात आणखी एक संशयित आयईडी आढळून आल्याने एडीजीपी सिंग यांनी लोकांना सावध केले. आयजी सीआरपीएफसह सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोचले आहेत.
रविवारी संध्याकाळी याच गावात गोळीबाराची घटना घडली असून त्यात चार जण ठार तर सहा जण जखमी झाले आहेत. दोन दहशतवाद्यांनी वरच्या डांगरी गावात एकमेकांपासून ५० मीटर अंतरावर असलेल्या तीन घरांवर गोळीबार केला. एलजी जम्मू आणि काश्मीर मनोज सिन्हा यांच्या कार्यालयाने गोळीबाराच्या घटनेत ठार झालेल्यांच्या नातेवाइकांना १० लाख रुपये आणि सरकारी नोकरीची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांना सर्वोत्तम उपचार सुनिश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड