दुबईत प्रथा दुर्ग मोहिमेच्या वारसा जपणाऱ्या कार्यशाळेत मुलांना किल्ल्यांचा अनोखा अनुभव

दुबई, ६ नोव्हेंबर २०२४ : यूएईत प्रथा संस्थेच्या दुसऱ्या वार्षिक दुर्ग मोहिमेचे यशस्वी आयोजन दुबईतील ममझार पार्कच्या हिरवळीवर करण्यात आले. महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली परंपरेची माहिती मुले आणि इतरांना व्हावी यासाठी सांस्कृतिक कार्यशाळा आणि प्रदर्शन करण्यात आले होते. या उपक्रमात ४० हून अधिक मुलांनी सक्रिय सहभाग घेतला, तर ५०० हून अधिक लोकांनी दुर्ग प्रदर्शनाचा आनंद घेतला. श्री. सुशील दादा मोझर आणि पाहुण्या श्रीमती वीना उत्तमचंदानी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला असून यावेळी प्रथा टीम, मुलं, आणि त्यांच्या पालकांच्या मेहनतीचे कौतुक मान्यवरांनी केले. कार्यक्रमाचे वातावरण आणखी रंगतदार बनवण्यासाठी त्रिविक्रम ढोल ताशा पथकाने पारंपरिक ठेका धरत रंगत आणली.

प्रथा यूएईचे संस्थापक सागर पाटील यांनी सांगितले की, “गेल्या वर्षी आम्ही मराठी समुदायातील २० मुलांसह हा उपक्रम सुरू केला होता, आणि या वर्षी मराठी आणि गैरमराठी समुदायातील ४० मुलांनी यात सहभाग घेतला असून यामधून आपल्या सांस्कृतिक वारशाविषयी वाढत असलेली आवड दिसून येते.” या कार्यशाळेत सांस्कृतिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले गेले. छत्रपती शिवाजी महाराज, बाजीप्रभू देशपांडे, बहिरजी नाईक आणि स्वराज्याचे मावळे यांच्याविषयी गोष्टी सांगून मुलांना त्यांचे पराक्रम, रणनिती आणि धैर्य शिकवण्यात आले. मुलांनी यामधून शिवाजी महाराजांनी दिलेल्या धड्यांमधून रोजच्या जीवनात लागू करता येतील असे धडे मिळवले.

गोष्टींनंतर मुलांनी स्वतः हाताळून माती व दगडांचा वापर करून दुर्ग बांधण्याचा अनुभव घेतला. त्यानंतर त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी रंग आणि सजावटीचा वापर केला. कार्यशाळा सहभागासाठी सगळ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले. प्रथा दुर्ग मोहिमेने युवा पिढीसाठी सांस्कृतिक शिक्षणाच्या क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण केला असून इथे मुलं शिकतात, सृजनशीलता जोपासतात आणि आपल्या परंपरेचा सन्मान करतात, असे गौरवोद्गार पाहुण्यांनी काढले.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा