डाख पँगोंग, ८ सप्टेंबर २०२०: लडाख सीमेवर भारत आणि चीनमधील तणाव वाढतच आहे. सोमवारी झालेल्या घटनेनंतर भारत आणि चीनचे सैनिक पुन्हा एकदा समोरासमोर आले आहेत. पँगोंग जवळील रेजांग ला येथे दोन्ही बाजूंनी सुमारे ४०-५० सैनिक समोरासमोर आले.
हा परिसर भारतीय सैन्याच्या ताब्यात आहे, परंतु चीनीचे ४०-५० सैनिक या भागामध्ये आले. चीनचा असा मनसुबा आहे की या भागातून भारतीय सैनिकांना हटवून रेजांग ला भागातील उंचावरील क्षेत्रात आपले वर्चस्व कायम करावे. तथापि, यात चिनी सैन्याला यश मिळवता आले नाही.
सोमवारी सायंकाळी चीनने लडाख सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, जेव्हा भारतीय सैनिकांनी त्यांना रोखले तेव्हा पीएलएच्या सैनिकांनी गोळीबार केला. हवाई गोळीबार करून भारतीय सैन्याला धमकावण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु भारतीय सैनिकांनी संयम ठेवला आणि चिनी सैन्याला परत पाठविले.
३० ऑगस्टच्या घटनेनंतर चीनने अनेक वेळा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी त्याला अपयश आले. प्रत्येक वेळी त्याच्या अयशस्वी प्रयत्नांनंतर भारतीय लष्करावर घुसखोरी झाल्याचा आरोप करत आहे.
सोमवारी झालेल्या घटनेनंतरही चिनी परराष्ट्र मंत्रालय, चिनी सैन्य आणि चिनी माध्यमांनी भारतावर घुसखोरी केल्याचा आणि गोळीबाराचा आरोप केला. पण भारतीय लष्कराने आपल्या निवेदनात चीनची लबाडी उघडकीस आणली.
वस्तुतः भारतीय सैन्याने काला टॉप, हेल्मेट टॉप आणि पँगोंग ४ परिसराचा भाग ताब्यात घेतल्यापासून चीनची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. कारण ही क्षेत्रे युद्धाच्या दृष्टीने रणनीतिकदृष्ट्या महत्वाची आहेत आणि यामुळेच कोणत्याही परिस्थितीत हे भाग पुन्हा ताब्यात घेण्यासाठी चीन प्रयत्न करत आहे. असे असले तरीही सध्या चीन यामध्ये यशस्वी झालेला दिसत नाही. त्यामुळे चीन आपल्या कारवाया सातत्याने वाढवताना दिसत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे