ड्रॅगनच्या धरणामुळे भारताची डोकेदुखी

China's Brahmaputra mega dam and its impact on India
ड्रॅगनच्या धरणामुळे भारताची डोकेदुखी

न्यूज अनकट प्रतिनिधी,भागा वरखाडे

चीन ब्रम्हपुत्रा नदीवर जगातील सर्वांत मोठे धरण बांधीत आहे. या धरणामुळे पर्यावरणाला जसा धोका आहे, तसाच चीन या धरणाचा उपयोग भारताविरोधात ढाल म्हणूनही करू शकतो. दुष्काळाच्या काळात पाणी अडवून धरणे तर अतिवृष्टीच्या काळात पूर्वकल्पना न देता पाणी सोडण्यामुळे लाखो लोकांच्या जीविताला जसा धोका आहे, तसाच ब्रम्हपुत्रेवरून अवलंबून असणाऱ्या भारत आणि बांगला देशातील शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यात चीनचे पंतप्रधान ली यांच्या हस्ते ब्रम्हपुत्रेवर बांधण्यात येणाऱ्या जगातील सर्वांत मोठ्या धरणाचे भूमिपूजन झाले. हे धरण बांधण्यास भारताने गेल्या सहा महिन्यांपूर्वीच आक्षेप घेतला होता. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या वर्षी जानेवारीमध्ये धरणाबद्दल चिंता व्यक्त केली होती. भारताने म्हटले होते, की ब्रह्मपुत्रेवर धरण बांधल्याने खालच्या राज्यांच्या हिताचे नुकसान होऊ शकते. भारताने चीनला धरणाच्या कामांमुळे खालच्या राज्यांमधील लोकांचे नुकसान होणार नाही याची खात्री करण्यास सांगितले होते; परंतु भारताचा आक्षेप धुडकावून लावून चीनने म्हटले होते, की या प्रकल्पाचा खालच्या प्रदेशांवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. असे असले, तरी चीनचा पूर्वानुभव लक्षात घेता त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. हा परिसर पृथ्वीच्या ‘टेक्टोनिक प्लेट’वर वसलेला आहे आणि भूकंपांसाठी अतिशय संवेदनशील आहे.

भारताच्या चिंतेपैकी एक म्हणजे धरण बांधल्याने या भागातील परिसंस्थेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे अनेक नैसर्गिक आपत्ती येऊ शकतात. ब्रह्मपुत्र नदी भारतात प्रवेश करण्यापूर्वी २५ हजार फूट उंचीवर जगातील सर्वात खोल दरी बनवते. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने येथे धरण बांधणे खूप आव्हानात्मक आहे. चीनच्या म्हणण्यानुसार, अनेक दशकांच्या संशोधनानंतर सुरक्षित पद्धतीने तेथे धरण बांधले जात आहे. तिबेटमधील प्रकल्पाला दशकांच्या संशोधनानंतर मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये पर्यावरणीय संवर्धनाला प्राधान्य देण्यात आले आहे. गेल्या पाच वर्षांपासून चीन सरकार वेळोवेळी माहिती देत होते, की ते ब्रह्मपुत्र नदीचे मुख्य स्रोत असलेल्या यारलुंग झांगबोजवळ जगातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे.

भारताने या प्रकल्पाबद्दल चीनकडे अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे; परंतु आता चीनने या प्रकल्पाचे बांधकाम सुरू केले आहे. अनेक तज्ज्ञांनी यापूर्वी चिंता व्यक्त केली आहे, की चीनने बांधलेले हा धरण प्रकल्प भारत आणि बांगला देशमधील ब्रह्मपुत्र नदी आणि यमुना नदीतील पाण्याच्या प्रवाहावर मोठ्या प्रमाणात परिणाम करू शकतो. यारलुंग झांगबो तिबेटमधून उगम पावते आणि अरुणाचल प्रदेशातून भारतात प्रवेश करते. अरुणाचल प्रदेशात, ते सियांग आणि दियांग नदीत रूपांतरित होते आणि आसाममध्ये ब्रह्मपुत्र नदीत रूपांतरित होते. दरम्यान, काही अधिक जलस्रोत त्यात सामील होतात आणि त्याला एक मोठे स्वरूप मिळते. बांगला देशात ती यमुना नदी म्हणून ओळखली जाते.

ज्या धरणाचे बांधकाम चीन सरकारने सुरू केले आहे, त्यातून किती वीज निर्माण होईल हे सांगितले गेले नाही; परंतु यापूर्वी तेथील सरकारी माध्यमांमध्ये अशी माहिती देण्यात आली आहे, की त्याची एकूण वीज निर्मिती क्षमता एक लाख मेगावॉट असू शकते. दोन्ही देशांमधील सामायिक नद्यांच्या स्थितीबाबत २००६ मध्ये तयार केलेल्या विशेष व्यवस्थेअंतर्गत चीनशी राजनैतिक पातळीवर चर्चा झाली आहे. चीनच्या या धरण प्रकल्पाबाबत अमेरिकन अंतराळ संस्था नासा तसेच भारतासह जगभरातील शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांचे म्हणणे आहे, की मानवांनी बनवलेल्या गोष्टी आणि नैसर्गिक घटना दोन्ही पृथ्वीच्या फिरण्याच्या गतीवर परिणाम करू शकतात. चीनने बांधलेल्या प्रचंड धरणाबद्दलही अशाच प्रकारची चिंता व्यक्त करण्यात आली आहे. एका अहवालानुसार, आजकाल जगात खूप मोठी बांधकामे केली जात आहेत.

दुबईचा बुर्ज खलिफा, सौदी अरेबियाचा शांघाय टॉवर आणि क्लॉक टॉवर्स ही त्याची उदाहरणे आहेत. या इमारती पाहण्यास खूप सुंदर आहेत; परंतु एक प्रश्न उद्भवतो, की त्यांचा आपल्या पृथ्वीवर काही परिणाम होतो का? चीनचे ‘थ्री गॉर्जेस’ धरण अशाच एका मोठ्या बांधकामांपैकी एक आहे. हे जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण आहे. ते चीनच्या ताकदीचा आणि अभियांत्रिकीचा नमुना आहे. ‘थ्री गॉर्जेस’ धरण वीज निर्मितीसाठी बांधण्यात आले आहे. यामुळे चीनला त्याचा प्रदेश व्यवस्थापित करण्यास मदत झाली आहे; परंतु या धरणाचा परिणाम केवळ यापुरता मर्यादित नाही. या धरणाचा आकार आणि वजन पाहता, शास्त्रज्ञ चर्चा करत आहेत, की त्याचा पृथ्वीच्या परिवलनाच्या गतीवरदेखील परिणाम होऊ शकतो का? ‘नासा’च्या मते, ‘थ्री गॉर्जेस’ धरणाच्या जलाशयात साचलेल्या पाण्यामुळे पृथ्वीच्या वस्तुमानाचे वितरण बदलते.

त्यामुळे पृथ्वीची परिवलन गती ०.०६ मायक्रोसेकंदांनी मंदावते. जलविद्युत निर्मितीमध्ये चीन आघाडीवर आहे. ‘थ्री गॉर्जेस’ धरण प्रचंड मोठे आहे; परंतु ते चीनच्या विजेच्या गरजेपैकी फक्त तीन टक्के गरज पूर्ण करते; परंतु त्याचे महत्त्व फक्त वीज निर्मितीपुरते मर्यादित नाही. २००५ मध्ये, ‘नासा’ने एका अहवालात म्हटले होते, की या धरणामुळे पृथ्वीच्या परिभ्रमणावर परिणाम होऊ शकतो. जेव्हा एखादी मोठी वस्तू आपली स्थिती बदलते, तेव्हा असे घडते. भूकंप किंवा जलाशय भरल्यामुळेदेखील हे होऊ शकते. ‘नासा’च्या गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटरचे डॉ. बेंजामिन फोंग चाओ म्हणतात, की कार चालवण्यासारख्या छोट्या गोष्टींचाही आपल्या पृथ्वीवर थोडासा परिणाम होतो.

‘थ्री गॉर्जेस’ धरणात भरपूर पाणी आहे. मानवी क्रियाकलाप अनवधानाने पृथ्वी कशी बदलू शकतात हे ते दर्शविते. आपल्याला आपल्या अभियांत्रिकीचा पुनर्विचार करण्याची गरज आहे. हे धरण मानव आणि निसर्ग कसे एकमेकांशी जोडलेले आहेत हे दर्शविते. जर ‘थ्री गॉर्जेस’ धरण पूर्णपणे भरले, तर ते सुमारे १०.६ ट्रिलियन गॅलन (४० घन किलोमीटर) पाणी साठवेल. यामुळे पृथ्वीचा आकार थोडा बदलेल. विषुववृत्तावर पृथ्वी थोडी गोलाकार आणि ध्रुवावर थोडी सपाट होईल.

मानवी क्रियाकलापांचा आपल्या पृथ्वीच्या परिभ्रमण गतीवर, हवामानावर आणि स्थिरतेवर मोठा परिणाम होऊ शकतो. आपण सतत नैसर्गिक संसाधनांचा वापर करत असतो, म्हणून या गोष्टी समजून घेणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. मोठ्या प्रकल्पांचा पृथ्वीवर होणारा परिणाम जाणून घेतल्यास, भविष्यात आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल. अहवालानुसार,पृथ्वीवर पाणी नद्या, तलाव आणि भूगर्भातील स्रोतांमधून येते. जेव्हा आपण पाणी वापरतो, तेव्हा आपण पृथ्वीवरील वजन कमी करतो. याचा पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या गतीवर थोडासा परिणाम होतो. जंगले कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात. जेव्हा आपण जंगले तोडतो, तेव्हा कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते.

यामुळे हवामान बदल होतो आणि पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या गतीवर परिणाम होतो. अहवालात म्हटले आहे, की जेव्हा आपण जमिनीतून खनिजे काढतो, तेव्हा त्याचा पृथ्वीवरदेखील परिणाम होतो. आपण खनिजे काढतो, तेव्हा आपण पृथ्वीवरील वजन कमी करतो. याचा पृथ्वीच्या परिभ्रमणाच्या गतीवर थोडासा परिणाम होतो. हे सर्व एकदा लक्षात घेतले, की चीन आता बांधत असलेले धरण किती धोकादायक आहे, हे लक्षात येईल. चीनच्या मते, मोटुओ जलविद्युत केंद्र नावाच्या या प्रकल्पाची किंमत सुमारे १.२ ट्रिलियन युआन म्हणजेच सुमारे १६७ अब्ज डॉलर्स (सुमारे १.४४ लाख कोटी रुपये) आहे. हे धरण पूर्ण झाल्यावर, ते जगातील सर्वात मोठे जलविद्युत धरण प्रकल्प बनेल आणि चीनच्या ‘थ्री गॉर्जेस’ धरणाला मागे टाकेल. त्याची ऊर्जा उत्पादन क्षमता सध्याच्या ‘थ्री गॉर्जेस’ धरणापेक्षा तिप्पट असल्याचे मानले जाते. चीनच्या १४ व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान या प्रकल्पाचा पहिल्यांदा उल्लेख करण्यात आला होता. २०२१ मध्ये तिबेट दौऱ्यादरम्यान अध्यक्ष शी जिनपिंग यांनी एका मोठ्या धरणाच्या बांधकामाची घोषणा केली. या प्रकल्पात पाच कॅस्केड जलविद्युत केंद्रे बांधली जातील. कॅस्केड म्हणजे एकामागून एक अनेक पातळ्यांवर उंचीवरून पाणी सोडले जाते, जेणेकरून वीज सतत निर्माण करता येईल.

या प्रकल्पाद्वारे, स्थानिक लोकांच्या वीज गरजा पूर्ण करण्यासोबतच, मोठ्या प्रमाणात व्यावसायिक वीजदेखील तयार केली जाईल. या प्रकल्पाद्वारे चीनचा कोळशावरील अवलंबित्व कमी करण्याचा आणि हरित ऊर्जेला प्रोत्साहन देण्याचा मानस आहे. २०६० पर्यंत ‘कार्बन न्यूट्रल’ होण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांनी अशी भीती व्यक्त केली आहे, की या नवीन धरणामुळे चीनला यारलुंग त्सांगपो सारख्या आंतरराष्ट्रीय नद्यांचा प्रवाह नियंत्रित करण्याची किंवा वळवण्याची शक्ती मिळू शकते. ही नदी तिबेटमधून उगम पावते आणि भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि आसाममधून वाहते आणि बांगला देशमध्ये यमुनाला मिळते. भारतात ती सियांग आणि ब्रह्मपुत्र म्हणून ओळखली जाते. ऑस्ट्रेलियातील ‘थिंक टँक लोवी इन्स्टिट्यूट’च्या २०२० च्या अहवालात म्हटले आहे, की तिबेट पठारातून वाहणाऱ्या या नद्यांवर नियंत्रण चीनला भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रभाव पाडण्याची मोठी शक्ती देते. भारतासोबतच बांगला देशानेही या प्रकल्पावर चिंता व्यक्त केली आहे.