कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी चीन लपवतोय; जागतिक आरोग्य संघटनेचा आरोप

बीजिंग, १३ जानेवारी २०२३ : चीनने कोरोना रुग्णांच्या मृत्युसंबंधीची आकडेवारी लपवल्याचा गंभीर आरोप जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस गेब्रेयसस यांनी केला आहे. यामुळे जगभरात होणाऱ्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या स्पष्ट नसल्याचेही ‘डब्ल्यूएचओ’कडून सांगण्यात आले आहे.

गेल्या आठवड्यात जागतिक आरोग्य संघटनेकडे ११ हजार ५०० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यापैकी ४० टक्के रुग्ण अमेरिका, ३० टक्के रुग्ण युरोप आणि उर्वरित ३० टक्के रुग्ण पश्चिम पॅसिफिक प्रदेशातील आहेत. चीनने कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या कमी नोंदविल्याने जगभरात झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या आकडा स्पष्ट नाही, अशी माहीती समोर आली आहे‌.

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटविरोधात लढण्यासाठी सर्वच देशांनी कोरोना रुग्णांच्या मृत्यूची योग्य आकडेवारी सार्वजनिक करणे आवश्यक आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा प्रसार रोखण्यासाठी सिक्वेन्सिंग ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. ‘डब्ल्यूएचओ’ने सर्वच देशांना सिक्वेन्सिंग वाढविण्याचे आवाहन केले आहे. यामुळे कोरोना रुग्णांची अचूक माहिती पुढे येण्यास मदत होईल.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा