३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन चीननं बळकावली: राजनाथ सिंह

नवी दिल्ली, १५ सप्टेंबर २०२०: लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषा (एलएसी) वर भारत-चीनमधील तणावाबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी लोकसभेत महत्वाची माहिती दिली. चीनबरोबर तणावाच्या मुद्यावर विरोधी पक्षांकडून सतत केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जातोय. संरक्षण मंत्र्यांकडून वारंवार सीमेवरील स्थितीबाबत माहिती मागितली जात आहे. राजनाथ सिंग यांनी आज लोकसभेत याविषयी बराच खुलासा केला तर जाणून घेऊया काय म्हणाले राजनाथ सिंग…

लोकसभेत राजनाथ सिंह म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी लडाख मध्ये गेले आणि लष्करी जवानांची भेट घेतली. त्यांनी असा संदेश देखील दिला होता की आपण आपल्या बहादूर सैन्याच्या पाठीशी उभे आहोत. मीसुद्धा लडाखला गेलो आणि जवानांसमवेत वेळ घालवला. मला सांगायचं आहे की पंतप्रधानांनी सैन्याचे धैर्य, शौर्य आणि पराक्रम यांचा अनुभव देखील घेतला. तुम्हाला माहिती आहे कर्नल संतोष यांनी मातृभूमीचे रक्षण करताना सर्वोच्च बलिदान दिलं.

चीनशी झालेल्या कराराबाबत राजनाथ सिंह म्हणाले की, असं म्हंटलं जात आहे की जोपर्यंत पूर्णपणे सीमा वादाचं समाधान होत नाही तोपर्यंत लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल वरील स्थिती सामान्य होणार नाही. १९९० पासून ते २००३ या काळात दोन्ही देशांमध्ये संयुक्त करार करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु त्यानंतर चीन या दिशेनं पुढं जाऊ शकला नाही. एप्रिलमध्ये लडाख सीमेवर चिनी सैन्य आणि शस्त्रास्त्रांची वाढ झाली. आपल्या गस्तीला चिनी सैन्यानं अडथळा आणला, त्या कारणामुळं सध्याची स्थिती उद्भवली आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिलेल्या वक्तव्यादरम्यान म्हटलं आहे की पारंपरिक रेषांविषयी दोन्ही देशांचं स्वतःचं वेगळं-वेगळं स्पष्टीकरण आहे, असं मत चीन मांडलं आहे. १९५०-६० च्या दशकात भारत-चीन या विषयावर चर्चा करत होते, पण त्यावर कोणताही तोडगा निघाला नाही. चीननं लडाखमधील काही जमीन फार पूर्वी ताब्यात घेतली होती, त्याव्यतिरिक्त पाकिस्ताननं पीओकेची काही जमीनही चीनच्या ताब्यात दिली. ही एक मोठी समस्या आहे आणि त्याचं निराकरण शांततेनं व वाटाघाटीनं करायला हवं. सीमेवर शांतता राखणं महत्वाचं आहे.

३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन चीननं बळकावली

लडाखमधील भारताची ३८ हजार स्क्वेअर किलोमीटर जमीन अनधिकृतपणे चीननं बळकावली आहे. त्याशिवाय १९६३ साली तथाकथित सीमा करारांतर्गत पाकिस्ताननं POK मधील ५,१८० स्क्वेअर किलोमीटरचा भूभाग बेकायदरित्या चीनकडं सोपवला अशी माहिती राजनाथ सिंह यांनी आज संसदेत दिली.

राजनाथ सिंह म्हणाले की १९९८ पासून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधात विकास झाला. द्विपक्षीय संबंधही विकसित होऊ शकतात आणि सीमावादावर देखील तोडगा निघू शकतो, असा भारताचा विश्वास आहे. तथापि, त्याचा द्विपक्षीय संबंधांवरही परिणाम होऊ शकतो.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा