नवी दिल्ली, १५ सप्टेंबर २०२०: भारतानं पुन्हा एकदा चीनला धक्का दिलाय. चीनला पराभूत करीत आर्थिक आणि सामाजिक परिषदेच्या (ईसीओएसओसी) संघटनेच्या संयुक्त राष्ट्रांच्या कमीशन ऑन स्टेटस ऑफ वूमेनचा सदस्य म्हणून भारत निवडला गेलाय. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी याबाबत माहिती दिली आहे.
टीएस तिरुमूर्ती म्हणाले की, “प्रतिष्ठित इकोसॉक संघटनेत भारतानं जागा जिंकली आहे. भारताची कमीशन ऑन स्टेटस ऑफ वूमन (सीएसडब्ल्यू) सदस्यपदी निवड झाली आहे. आमच्या सर्व प्रयत्नांमध्ये लैंगिक समानता आणि महिला सबलीकरणास प्रोत्साहित करण्याच्या आमच्या बांधिलकीचे हे महत्त्वपूर्ण समर्थन आहे. आम्ही सदस्य देशांना त्यांच्या समर्थनाबद्दल आभार मानतो.”


भारत, अफगाणिस्तान आणि चीननं कमीशन ऑन स्टेटस ऑफ वूमन’साठी निवडणूक लढविली. यामध्ये भारत आणि अफगाणिस्ताननं ५४ सदस्यांसह निवडणूक जिंकली, तर चीनला पराभवाचा सामना करावा लागला. चीनला निम्मी मतंही जमवता आली नाहीत.
चार वर्षासाठी सदस्य
बीजिंग वर्ल्ड कॉन्फ्रेंस ऑन वूमन (१९९५) चे हे २५ वे वर्धापन वर्ष आहे. यानिमित्तानं चीनला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्याचबरोबर भारत आता चार वर्ष या आयोगाचा सदस्य असल. २०२१ ते २०२५ पर्यंत भारत कमीशन ऑन स्टेटस ऑफ वूमेन विषयी संयुक्त राष्ट्र आयोगाचा सदस्य असेल.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे