लडाख, १८ मार्च २०२३: चीन पुर्व लडाखमधील गेल्या तीन वर्षांच्या लष्करी संघर्षादरम्यान अत्यंत वेगाने सीमेवर पायाभूत सुविधा निर्माण करत आहे. तसेच एलएसीजवळ सैन्य कमी केले नाही, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी सांगितले आहे. लडाखमध्ये अनेक घुसखोरी केल्यापासून पीपल्स लिबरेशन आर्मीने जड शस्त्रास्त्रांसह सुमारे ५०.००० सैनिक पुढे तैनात ठेवले आहेत.
कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमच्याकडे पुरेसा साठा आहे. नवीन तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र प्रणालींचा समावेश करुन, क्षमता विकास करणे याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याचप्रमाणे आम्ही पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष केंद्रित करत आहोत. विशेषतः फॉरवर्ड एरिआमध्ये रस्ते, हेलिपॅड इत्यादीसारख्या सुविधा निर्माण करण्याकडे आमचे लक्ष आहे.
पूर्व लडाखमधील डेपसांग मैदाने आणि डेमचोक येथील राहिलेले संघर्षपूर्ण मुद्दे, चीनसोबतच्या राजनैतिक आणि लष्करी चर्चेमुळे सोडवले जातील, अशी आशा यावेळी लष्करप्रमुखांनी व्यक्त केली. संवादातून आणि एकमेकांशी बोलूनच आपण ही समस्या सोडवू शकतो. आमचे ध्येय आणि प्रयत्नही तेच आहेत. जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत आमचे सैन्य तैनात करणे, सतर्कता पातळी उच्च पातळीवर राहील, असे लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी स्पष्ट केले आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर