चीनची धमकी ; भारताने तिबेट प्रकरणाला हात लावू नये अन्यथा परिणाम वाईट होतील

बीजिंग, दि. ७ जुलै २०२० : चीनमधील कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र ग्लोबल टाइम्सने भारताला पुन्हा एकदा धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे. ग्लोबल टाईम्सच्या माध्यामातून चिनी सरकार आपले संदेश हे इतर देशांत पोहोचवण्याचे काम करत असते. ग्लोबल टाइम्सच्या संपादकीय लेखामध्ये असे म्हटले गेले आहे की, भारताच्या काही भागांमध्ये तेथील प्रसारमाध्यमे असे सांगत आहेत की भारताने चीन विरूद्ध तिबेटचे कार्ड वापरायला हवे. (म्हणजेच भारताने तिबेटचा मुद्दा उचलून धरण्यास सुरुवात करायला हवी) चीनी वृत्तपत्राने सांगितले की भारतीय प्रसारमाध्यमे सांगत असलेला हा मार्ग हास्यास्पद आणि चुकीचा आहे.

‘प्रस्तावित तिब्बत कार्ड’ भारतीय अर्थव्यवस्थेला हानीकारक ‘या शीर्षकाच्या लेखात वृत्तपत्राने असे म्हटले आहे की, चीनमधील तणावाच्या वेळी तिबेट कार्डचा फायदा होऊ शकेल असा विचार करणार्‍या काही लोकांची कल्पना ही एक भ्रम आहे. वर्तमानपत्राने लिहिले आहे की तिबेट ही चीनची अंतर्गत बाब आहे आणि या मुद्याला स्पर्श करु नये. ग्लोबल टाईम्सने तिबेटच्या प्रगतीविषयीही लिहिले आहे. यात असा दावा केला जात आहे, की अलिकडच्या काही वर्षांत तिबेटच्या स्वायत्त प्रदेशात तुलनात्मकदृष्ट्या वेगवान विकास झाला आहे.

ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे की तिबेटमध्ये स्थिर सामाजिक वातावरण तयार करण्यासाठी वेगवान विकास हा एक चांगला पाया आहे. चिनी इंग्रजी वृत्तपत्राने असे म्हटले आहे की ‘तथाकथित’ तिबेट कार्ड काही भारतीयांच्या कल्पनेचे प्रतिबिंब आहे आणि ते खरोखर महत्वाचे नाही.

२०१९ मध्ये तिबेटचा जीडीपी ८.१ टक्क्यांनी वाढला असा दावाही चीनने केला आहे. तिबेटनेही ७१ देशांशी व्यापार संबंध निर्माण केले. नेपाळबरोबर तिबेटच्या व्यापारात २६.७ टक्के वाढ झाली आहे. ग्लोबल टाईम्सने लिहिले आहे की चीनविरोधी काही शक्ती तिबेट प्रकरणाचा उपयोग चीनच्या वन चीन धोरणाविरूद्ध चिथावणी देणारे काम करत आहेत. परंतु अशा शब्दांपेक्षा तथ्य अधिक प्रभावी आहे.

चीनने असे म्हटले आहे की जर तिबेटची अर्थव्यवस्था वेगाने वाढली तर समाजात स्थिरता येईल. यामुळे चीन आणि भारत यांच्या व्यापार संबंधातही सुधारणा होईल. चीनने म्हटले आहे की तिबेट क्षेत्राच्या आसपास असलेल्या राज्यांमध्ये आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी भारत अधिक प्रयत्न करेल अशी आशा आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा