पिंपरी, ३ जानेवारी २०२३ : पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे माजी अध्यक्ष आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (वय ५९) यांचे आज मंगळवारी (ता. तीन) प्रदीर्घ आजाराने निधन झाले. मागील अनेक महिन्यांपासून ते आजारी होते. पुण्यातील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
मध्यंतरी अमेरिकेहून मागविलेल्या इंजेक्शनमुळे आमदार जगताप यांच्या प्रकृतीत लक्षणीय सुधारणा झाली होती. इंजेक्शन दिल्यानंतर ते खुर्चीत बसू व काही पावले चालूही लागले होते. शिवाय विधान परिषद निवडणुकीसाठी जगताप मुंबईला मतदानासाठीही गेले होते; मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली. पिंपळे गुरव येथील (पिंपरी चिंचवड) रहिवासी असलेले लक्ष्मण जगताप यांची राजकीय कारकीर्द काॅंग्रेस पक्षापासून सुरू झाली. १९९२ च्या निवडणुकीत ते नगरसेवकपदी निवडून आले. १९९७ च्या निवडणुकीतही ते निवडून आले. सलग दहा वर्षे त्यांनी पिंपळे गुरवचे प्रतिनिधित्व केले. १९९३-९४मध्ये ते महापालिका स्थायी समिती सभापती होते. १९९८ मध्ये अस्तित्वात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये त्यांनी प्रवेश केला. ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांचे निष्ठावान कार्यकर्ता अशी त्यांची ओळख होती. १९ डिसेंबर २००० ते १३ मार्च २००२ या कालावधीत त्यांनी पिंपरी-चिंचवडचे महापौरपद भूषविले; मात्र २००३-०४ मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी स्थानिक स्वराज्य संस्था गटातून त्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे त्यांनी बंडखोरी केली. विधान परिषदेची निवडणूक अपक्ष लढवून विजय मिळवला.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जगताप यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली होती. त्यावेळी जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढविली. त्यात त्यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला; तसेच २०१४ ची विधानसभा निवडणूक भाजपतर्फे लढवून विजय मिळविला.
देवेंद्र फडणवीसांनी मानले होते आभार
जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या या मतदानाच्या वेळी पुण्यातील कसबा पेठेच्या आमदार मुक्ता टिळक यादेखील कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होत्या. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांनी प्रकृती चिंताजनक असतानाही भाजपसाठी मतदान केलं होतं. त्यामुळे या दोन्ही आमदारांचे विशेष आभार मानले होते. २२ डिसेंबर रोजी मुक्ता टिळक यांचे निधन झाले, तर आज मंगळवारी (ता. तीन जानेवारी) लक्ष्मण जगताप यांनी देखील आखेरचा श्वास घेतला. यामुळे भाजपाने दोन महत्त्वाच्या नेत्यांना गमावल्याची स्थिती आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सतीश पाटील