नवी दिल्ली, दि. ४ जुलै २०२०: लडाख मध्ये झालेल्या हिंसक चकमकीनंतर भारताच्या २० जवानांना वीरमरण आले होते. यानंतर संपूर्ण देशांमध्ये चिनी उत्पादनांच्या विरोधात निषेध व्यक्त केला जात आहे. सरकारने देखील आता चीन विरोधात पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांचे समर्थन करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय कंपन्यां विषयी बोलताना म्हणाले की, भारतातील कालबाह्य झालेल्या नियमांमुळे चिनी कंपन्यांना फायदा होत आहे आणि त्याचे नुकसान भारतीय कंपन्यांना सोसावे लागत आहे. याविषयी बोलताना ते म्हणाले की, “देशात असे अनेक कालबाह्य नियम आहेत आणि त्यामुळे चिनी कंपन्यांचा त्याची मदत होत आहे. राष्ट्रीय हित आणि भारतीय कंपन्यांच्या हितासाठी त्या नियमांचे पुनरावलोकन केले जावे,”
एनडीटीव्ही इंडियाला दिलेल्या विशेष मुलाखतीत नितीन गडकरी यांनी याविषयी माहिती दिली. मुलाखतीत पुढे बोलताना ते म्हणाले की, “यापुढे चिनी कंपन्यांना महामार्गाच्या प्रकल्पात सहभागी करून घेतलं जाणार नाही. याव्यतिरिक्त त्यांना संयुक्त उपक्रमांमध्येही सहभागी केलं जाणार नाही. तसंच ज्या कंपन्यांना चीनकडून वीज पुरवठा करणारी उपकरणं किंवा अन्य वस्तूंची आयात करावी लागणार आहे त्यांना सरकारची परवानगी घ्यावी लागेल असं ऊर्जा मंत्रालयानं म्हटलं आहे.”
“आपले नियम कालबाह्य झाले आहे. त्या नियमांनी कंत्राटदारांना कडक अटी घालून दिल्या. उदाहरणार्थ मोठे महामार्ग व पुलांच्या उभारणीसाठी ज्या कंत्राटदारांना अनुभव आहे अशाच कंत्राटदारांना परवानगी देण्यात येत होती. त्यामुळे आपल्या देशातील इतर कोणत्याही कंपन्यांना परवानगी देता येत नव्हती ,” असंही ते म्हणाले.
न्यूज अनकट प्रतिनिधी