मुंबई, दि. १९ जून २०२०: भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत एकूण १७ राजकीय पक्षांचे नेते सहभागी होतील. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चीनच्या गुंतवणूकीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय धोरणाची मागणी करू शकतात.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा मुद्दा उपस्थित करतील. यामध्ये चिनी गुंतवणूकीच्या राष्ट्रीय धोरणाबरोबरच प्रकल्पांबाबत धोरणाची मागणीदेखील करण्यात येईल. केंद्र सरकारने धोरण तयार करावे, अशी मागणी शिवसेनेने केली असून यामध्ये चिनी प्रकल्पांमध्ये गुंतवणूक, चीनी कंपन्यांद्वारे भारतातील गुंतवणूकीबाबत काही नियम व धोरण निश्चित केले जावे असे शिवसेनेचे म्हणणे आहे.
१५ जून रोजी गलवान खोऱ्यात चिनी सैनिकां सोबत चकमकीच्या वेळी भारताचे २० सैनिक शहीद झाले होते. तेव्हापासून देशात चीनविरूद्ध रोष आहे, वेगवेगळ्या भागातील लोक रस्त्यावर उतरत आहेत आणि चीनविरोधात निषेध करत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी.