मुंबई : यंदाच्या ख्रिसमस आणि नव्या वर्षाच्या स्वागताकरीता पार्ट्यांच्या आयोजनासाठी विविध हॉटेल्स, पब्ज आणि सज्ज झाले आहेत. मात्र, अशा ठिकाणी होणाऱ्या मद्यधुंद पार्ट्यांमध्ये विनापरवाना गाणी वाजवण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सोमवारी मुंबई हायकोर्टाने अशा प्रकारचे आदेश दिले.
याबाबत हायकोर्टाने म्हटले की, शहरातील हॉटेल्स, पब्ज मध्ये ख्रिसमस आणि नव्या वर्षांच्या निमित्तानं आयोजित पार्ट्यांमध्ये फिल्मी आणि गैरफिल्मी गाणी परवाना शुल्क व सुरक्षित कॉपीराईट परवानग्या दिल्याशिवाय वाजवता येणार नाहीत. शिवाय कोणत्याही प्रकारची गाणी वाजवण्यापूर्वी आयोजकांनी त्यासाठीचे परवाना शुल्क भरून ‘फोनोग्राफिक परफॉर्मन्स’ची (पीपीएल) परवानगी घ्यावी, असेही हायकोर्टाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.
सुमारे १९४१ मध्ये ‘पीपीएल’ची स्थापना झाली. या संस्थेकडे विविध भाषांतील २५ लाखांहून अधिक चित्रपट आणि अन्य गाण्यांचे हक्क राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी ख्रिसमस साजरा करताना तसेच नववर्षांचे स्वागत करताना संस्थेची परवानगी घेणे आणि गाणी वाजवण्याचे परवाना शुल्क देणे गरजेचे आहे.
मात्र, असे असले तरी हॉटेल्स आणि रेस्तराँमध्ये ख्रिसमस आणि नववर्षांनिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या पार्ट्यांमध्ये संस्थेचे हक्क असलेली गाणी विनापरवाना वाजवण्यात येत असल्याचा आरोप केला. तसेच परवाना शुल्क देणे आणि संस्थेची परवानगी घेण्याबाबत आयोजकांना दिलेल्या आदेशांचे पालन करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी संस्थेने हायकोर्टाकडे केली होती.