या राज्यात १ ऑक्टोबरपासून चित्रपटगृह उघडणार 

कोलकत्ता, २७ सप्टेंबर २०२०: कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे देशभरात चित्रपटगृह, मॉल्स, जिम्स अशी अनेक गर्दीची ठिकाणं बंद करण्यात आली होती. मात्र आता केंद्र सरकारनं नवीन नियमावली जाहीर करत चित्रपटगृह आणि अन्य ठिकाणं सुरु करण्यासाठी राज्य सरकारला निर्णय घेण्याची सूट दिली. त्यानुसार पश्चिम बंगाल या राज्यात आता १ ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरु करण्याचा निर्णय पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतलाय. कोरोना काळात चित्रपटगृह सुरु करणारं पश्चिम बंगाल हे देशातलं पाहिलं राज्य ठरलंय .

“नॉर्मल आयुष्याकडे परतण्यासाठी जत्रा, नाटकं, सिनेमा, संगीत तसंच जादुच्या प्रयोगांसारखे कार्यक्रम १ ऑक्टोबरपासून सुरू करता येतील. यामध्ये ५० लोकांनाच उपस्थित राहण्याची परवानगी मिळेल. यादरम्यान, सोशल डिस्टन्सिंग, मास्क व इतर खबरदारी घेणं बंधनकारक असेल,” असं ममता बॅनर्जी यांनी ट्वीट करत ही घोषणा केली आहे.

देशात कोरोना रुग्णांची संख्या ५८ लाखांच्या पार गेली आहे. मात्र लॉकडाऊनमुळे ढासळलेली अर्थव्यवस्था पुन्हा पटरीवर आणण्यासाठी देशात अनलॉकची प्रक्रिया सुरु आहे. त्यानुसार कोविडचे प्रोटोकॉल्स पाळून हळू-हळू अनेक उद्योग सुरु करण्यात येत आहेत. त्यानुसार फिजिकल डिस्टन्स ठेवत चित्रपटगृह सुरु करण्यात येणार आहेत. मात्र इतर राज्यांनी अजूनतरी चित्रपटगृह खुले करण्याबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नाही. महाराष्ट्रात कोरोना रुग्ण सर्वाधिक असल्यानं राज्यात चित्रपटगृह लवकर सुरु होण्याची चिन्ह दिसत नाहीत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: अक्षय बैसाणे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा