राम मंदिर आणि सीएए वरील राजकारणाला बिहार मधील नागरिकांनी नाकारलं, एक्झिट पोल मध्ये खुलासा

11

नवी दिल्ली, ८ नोव्हेंबर २०२०: बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांच्या तीन टप्प्यांची प्रक्रिया संपली आहे. आता प्रत्येकजण १० नोव्हेंबरला येणाऱ्या निकालाची वाट पाहत आहे. निकालांच्या अगोदर इंडिया टुडे अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनं जनतेचा मूड उघड केला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अनेक राष्ट्रीय मुद्द्यांचा उल्लेखही करण्यात आला होता, या एक्झिट पोलमध्ये जनतेला प्रश्न विचारण्यात आले होते.

एक्झिट पोलनुसार, बिहार विधानसभा निवडणुकीत राम मंदिर, नागरिकत्व दुरुस्ती कायदा, चीन यामधील तणाव हा मोठा मुद्दा बनू शकला नाही.

सर्वेक्षणात, जेव्हा लोकांना असं विचारलं गेलं की तुम्हाला राज्यात महा गटबंधन सरकार का हवं आहे? तेव्हा केवळ एक टक्का लोकांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (सीएए) विरोध केल्यामुळं मतदान केल्याचा उल्लेख केला. जेव्हा सर्वेक्षणात लोकांना एनडीए सरकारला मत देण्याचं कारण विचारलं गेलं तेव्हा फक्त एक टक्के लोकांसाठी राम मंदिर सर्वात मोठा मुद्दा बनला.

एक्झिट पोलनुसार निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा विकास होता. जवळपास ४२ टक्के लोकांच्या मते विकासाचा मुद्दा पहिल्या क्रमांकावर राहिला आहे आणि बेरोजगारीचा मुद्दा ३० टक्क्यांसोबत दुसर्‍या क्रमांकावर आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सभांमध्ये राम मंदिर, सीएए आणि चीन या विषयावर बर्‍याचदा चर्चा होत असे, स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सभांमध्ये जनतेला संबोधित करताना अनेक वेळा विरोधी पक्षांवर टीका करताना असं म्हटलं होतं की जय श्री राम आणि भारत माता की जय या गोष्टींपासून विरोधी पक्षांना अडचणी आहेत. तसंच, यूपीचे सीएम योगी आदित्यनाथ यांच्या माध्यमातून बिहारमधील एनडीएनं अयोध्याचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु यंदा बिहारमधील नागरिकांनी वास्तव मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केलं होतं.

दुसरीकडं नितीश सरकार यांना तेजस्वी यादव आणि आरजेडीकडून सतत लक्ष्य केलं जात होतं. तेजस्वी यांनी सभांमध्ये वारंवार सांगितलं की आम्ही फक्त नितीश सरकारच्या अपयशांबद्दल बोलत आहोत.

विशेष म्हणजे बिहारमध्ये या वेळी विधानसभा निवडणुका ३ टप्प्यात घेण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात २८ ऑक्टोबरला ७१ जागांसाठी, दुसर्‍या टप्प्यातील ३ नोव्हेंबरला ९४ आणि तिसर्‍या टप्प्यात ७ नोव्हेंबरला ७८ जागांसाठी मतदान झालं. इंडिया टुडे-अ‍ॅक्सिस-माय-इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये एकूण २४३ विधानसभा मतदार संघांचे सर्वेक्षण केलं गेलं आहे. सर्वेक्षणांचे सॅम्पल साईज ६३०८१ होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा