सातारा, ११ नोव्हेंबर २०२० : नागरिकांनी दिवाळीचा सण साजरा करताना शासनाच्या नियमांचं पालन करावं. स्वत:ची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घेवून योग्य ती दक्षता घ्यावी, असं आवाहन सातारा जिल्ह्याचे संपर्कमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केलं आहे. सण समारंभ आणि पै-पाहुणे यांच्याकडे ये-जा करत असताना, दीपावलीच्या खरेदीसाठी बाहेर जात असताना मास्कचा वापर करावा आणि स्वच्छता ठेवावी, सुरक्षित अंतराचं पालन करावं, दीपावली हा दीपोत्सव साजरा करण्याचा आणि आनंदाचा सण आहे.
कोरोना साथीमुळे आपल्यातील अनेक सहकारी आणि नातेवाईक आपणास सोडून गेले आहेत. त्यांच्या जाण्याची दुख:ची किनार या दीपावली सणास आहे याचं भान ठेवा असं ते म्हणाले. सध्या रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये थोडीशी शिथिलता आलेली दिसून येत आहे. परंतू कोरोनाचं संकट पूर्णपणे टळलेलं नाही.
लोक दीपावलीच्या सणाच्या खरेदीसाठी मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत. खरेदीच्या ठिकाणी गर्दी होत आहे. बऱ्याच ठिकाणी सुरक्षित अंतराचे पालन केले जात नाही. अनेक जण मास्कचा वापर करीत नाहीत तसेच मास्क वापरला तरी बोलताना मास्क नाकाच्या खाली घेऊन बोलतात. त्यामुळे भविष्यात धोका वाढण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी शासनाने दिलेल्या सुचनांचे तंतोतंत पालन करावे, असं आवाहनही पाटील यांनी केलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी: