नवी दिल्ली, २० ऑगस्ट २०२०: आग्र्याहून बसचे अपहरण करणारे व पोलिस यांच्यामध्ये गुरुवारी पहाटे गोळीबार झाला. फतेहाबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत तपासणी दरम्यान आरोपींनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिस आणि गुन्हेगार यांच्यामध्ये झालेल्या चकमकीमध्ये एका गुन्हेगाराच्या पायाला गोळी लागली तर एक गुन्हेगार पळून जाण्यामध्ये यशस्वी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी झालेल्या गुन्हेगाराचे नाव प्रदीप गुप्ता असे आहे. बस अपहरण झाल्यानंतर प्रदीपचं नाव समोर येत होते. सध्या पोलिसांनी जखमी प्रदीप गुप्ता याला रुग्णालयामध्ये भरती केले आहे. रुग्णालयामध्ये उच्च पोलीस अधिकारी व पोलीस प्रदीपची विचारपूस करत आहे. तसेच अन्य आरोपींना शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण
काल पहाटे ३ वाजता गुरुग्रामहून मौरानीपूर, छतरपूर, झाशीतील पन्ना येथे ३४ प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस निघाली होती. बस आग्राच्या दक्षिणेकडील बायपासजवळ येताच बसला काही लोकांनी ओव्हरटेक केले आणि गाडीवर कर्ज आहे व त्याचा हप्ता देखील थकीत आहे असे सांगण्यात आले.
कार मध्ये असलेल्या व्यक्तींनी सांगितले की ही बस आता आम्ही घेऊन जात आहोत. कार मध्ये एका व्यक्तीने बसमध्ये प्रवेश करत ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना प्रवाशांच्या जागेवर बसवले व बस नेण्यास सुरुवात केली. बसमधील प्रवाशांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती नंतर बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवून त्यांना झांशीच्या दिशेने पाठवण्यात आले आहे.
काल अपहरण झालेली बस इटावा येथून ताब्यात घेण्यात आली. यानिमित्ताने गुन्हेगारांचा शोध सुरू झाला. फतेहाबाद येथे आज पहाटे काही गुन्हेगारांशी पोलिसांची चकमकी झाली. यामध्ये एक गुन्हेगार जखमी होऊन पोलिसांच्या ताब्यात सापडला आहे तर एक फरार झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी