बारावी बोर्डाची परीक्षा सुरू; नीरा केंद्रात तीन महाविद्यालयातील ३२५ परिक्षार्थी

नीरा, २१ फेब्रुवारी २०२४ : नीरा ( ता.पुरंदर ) येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात बुधवारी (दि.२१) बारावी (एच.एस.सी) बोर्डाची परिक्षा सुरळीत सुरू झाली. १३२ मुलं, १७४ मुली असे ३२५ परिक्षार्थी नीरा केंद्रात परिक्षा देत आहेत. परिक्षार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचा तणाव असतो. तो दूर करण्यासाठी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

नीरा केंद्रावर परिसरातील तीन कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये नीरेतील किलाचंद कनिष्ठ महाविद्यालयातील २०५, लिलावाती रिखवलाल शहा कन्या महाविद्यालयातील २४, वाल्हा येथील महर्षी वाल्मिक कनिष्ठ महाविद्यालयातील ९६ असे एकूण ३२५ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले आहेत.  बुधवार दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता परिक्षा सुरळीत सुरू झाली असून ही परीक्षा १६ मार्च पर्यंत या केंद्रात सुरू राहणार आहे.

नीरा येथील परिक्षा केंद्रात १३ वर्ग खोल्यांमधून बैठक व्यवस्था करण्यात आली होती. परिक्षेसाठी लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा पुरविण्यात आल्या असल्याचे किलाचंद ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य व केंद्र प्रमुख अर्जून कोकरे यांनी माहिती दिली. या परिक्षा केंद्रावर दक्षता कमेटीची नेमणूक केली आहे. परिक्षा काळात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून नीरा पोलीस दुरक्षेत्राताचे सहाय्यक उपनिरीक्षक संदिप मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली दोन होमगार्डचे कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. नीरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक बापूसाहेब भंडलकर व शिवाजी चव्हाण यांनी प्रथमोपचार पेटीची व्यवस्था केली आहे. ही परिक्षा भयमुक्त वातावरणात संपन्न होतील अशी माहिती सहायक केंद्र प्रमुख जालिंदर टोणे यांनी दिली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : राहुल शिंदे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा