‘आपले किल्ले, आपली जबाबदारी’अंतर्गत सातारा जिल्हा पोलिस दलातर्फे संतोषगड किल्ल्यावर स्वच्छ्ता मोहीम

फलटण (जि. सातारा) ७ मार्च २०२३ : सातारा जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्ह्यातील पोलिसांनी ‘आपले किल्ले, आपली जबाबदारी’अंतर्गत रविवारी (ता.५ मार्च) ‘आपले किल्ले, आपली जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत संतोषगड किल्ल्यावर चढाई मोहीम, गड भ्रमंती व स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेमध्ये पोलिस खात्यातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने होते.

या गड-किल्ल्यांअंतर्गत किल्ले संतोषगड येथील महालक्ष्मी मंदिर व शिवकालीन बारव, विहीर; तसेच इतर ठिकाणी स्वच्छ्ता मोहीम यशस्वी केली. या मोहिमेदरम्यान जैविक व अजैविक असा अंदाजे ५५किलो कचरा गोळा करण्यात आला. त्यानंतर किल्ल्याच्या खाली असणाऱ्या श्री संत गाडगे महाराज निवासी आश्रमशाळा ताथवडा येथे सर्वांनी एकत्रित जमून स्थानिक नागरिक श्री. मोहन निवृत्ती जाधव यांनी संतोषगडाची सविस्तर माहिती दिली.

या मोहिमेमध्ये सातारा जिल्हा पोलिस अधीक्षक समीर शेख, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे, फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, खंडाळा पोलिस स्टेशनचे एम. के. इंगळे, शिरवळ पोलिस स्टेशनचे एन. के. मदने, फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सुशील भोसले, लोणंद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक व्ही. के. वायकर, फलटण शहर पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन केणेकर असे एकूण वीस पोलिस अधिकारी, ११२ पोलिस अंमलदार व ७६९ नागरिक, पत्रकार व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

सातारा जिल्हा पोलिस दलामार्फत ‘आपली किल्ले, आपली जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत किल्ले अजिंक्यतारा, वसंतगड, जरंडेश्वर, वैराटगड व आता संतोषगड या ठिकाणी गड मोहीम व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आज अखेर या मोहिमेत ऐंशी पोलिस अधिकारी, ४८१ पोलिस अंमलदार, १४५० नागरिक व विद्यार्थ्यांनी अंदाजे ५९९ किलो कचरा गोळा करून त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली.

सातारा पोलिस दलामार्फत प्रत्येक रविवारी सातारा जिल्ह्यातील एक किल्ला निवडून सदरची मोहीम राबविण्यात येणार असून, या मोहिमेमध्ये नागरिक, व्यापारी व तरुणांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहान जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात आले आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : आनंद पवार

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा