शिमला, १२ जुलै २०२३ : हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये ढगफुटी झाली आहे. या दोन्ही राज्यात पावसाने थैमान घातले आहे. पावसाचा सर्वाधिक कहर हिमाचल प्रदेशात झाला आहे. हिमाचल प्रदेशात झालेल्या भयानक पावसामुळे आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो घरे पाण्यात गेली आहे. अनेकजण विस्थापित झाले आहेत. अनेकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे. तर एअर लिफ्टद्वारे अनेकांचे जीव वाचवले जात आहेत. शिमला नालागड रोड भूस्खलनामुळे गेल्या तीन दिवसांपासून बंद पडला आहे. तिच परिस्थिती पंजाबमध्येही आहे. पंजाबमध्येही पावसाने हाहाकार घातला असून आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हिमालच प्रदेशात आतापर्यंत पावसाने ८० जणांचा बळी घेतला आहे. यात रस्ते अपघातात झालेल्या मृतांचाही समावेश आहे. तसेच आतापर्यंत पावसामुळे ४७० जनावरांचा मृत्यू झाला आहे. पावासामुळे आतापर्यंत १०० च्या वर घरे जमीनदोस्त झाली आहेत. तर ३५० घरांचे प्रचंड नुकसान झाले आहेत. पावसामुळे दहा लोक बेपत्ता झाले असून त्यांचा शोध लागत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
राज्यात पावसामुळे जागोजागी भूस्खलन होत आहे. भूस्खलनामुळे आतापर्यंत रस्ते बंद करण्यात आले आहेत. २५७७ ट्रान्सफार्मर खराब झाले आहेत. शेकडो गावे अंधारात आहेत. १४१८ पाणी पुरवठा योजनांवर याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्याचा पुरवठा होत नाही. वाहतूक, वीज आणि फोन सेवाही बाधित झाली आहे. राज्यात आठ ठिकाणी प्रचंड पाऊस झाल्याने पूर आला आहे.
शिमला, सिरमौर आणि किनौर आदी जिल्ह्यात मध्यम ते प्रचंड मोठा पूर येण्याची शक्यता आहे. तसेच सिरमौर, शिमला, मंडी आणि किन्नौरमध्ये प्रचंड पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या २४ तासात नहान येथे सर्वाधिक २५० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. या भागातील विमान सेवा बंद करण्यात आली आहे.
पंजाबमध्येही गेल्या तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. चंदीगडमध्ये गेल्या २४ तासात ३२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २३ वर्षातील हा सर्वाधिक पाऊस असून या पावसामुळे दहा जणांचा मृत्यू झाला आहे. चंदीगडमध्ये डेरा बस्सी येथे तर अनेक लोक नावेतून प्रवास करताना दिसत आहेत. पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर