सिक्कीम, ४ ऑक्टोबर २०२३ : उत्तर सिक्कीममधील लोनाक सरोवरावर येथे ढगफुटी झाली आहे, त्यामुळे लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला अचानक पूर आला. पूरात लष्कराचे २३ जवान बेपत्ता तर काही वाहने गाळाखाली दबल्याची माहिती समोर आली आहे. बेपत्ता जवानांची शोध मोहीम सुरू आहे. गुवाहाटी संरक्षण पीआरओ यांनी ही माहिती दिली आहे.
उत्तर सिक्कीममधील लोनाक सरोवरावर येथे अचानक ढगफुटीमुळे रात्री पूर आला. ज्यामुळे तीस्ता नदीमधील पाण्याची पातळी अचानक वाढली. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने परिस्थिती आणखीनच बिकट झाली. त्यामुळे पाण्याची पातळी १५ ते २० फुट उंच झाली आहे. लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सिंगतामजवळील बारडांग येथे उभी असलेली लष्कराची वाहने पूराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. बेपत्ता जवानांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू आहे. अचानक आलेल्या पुरामुळे लाचेन खोऱ्यातील अनेक लष्करी आस्थापनांचेही नुकसान झाले आहे. संपूर्ण नुकसानीचा अंदाज घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तीस्ता नदीवरील सिंगथम फुट पुल ओसंडून वाहणाऱ्या नदीमुळे कोसळला. सिक्कीम सरकारने राज्यात हाय अलर्ट जारी केला असून लोकांना तीस्ता नदीपासून दूर राहण्यास सांगितले आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर