हिंगोली, २७ सप्टेंबर २०२३ : मंगळवारी (२६ सप्टेंबर) हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बळेगाव,टेंभुर्णी, बोरी सावंत, हापसापुर, विरेगाव, आरळ या गावांसह इतर गावांना सुद्धा पावसाचा फटका बसला आहे. सुरुवातीला पावसाळा महिनाभराने उशिरा सुरू झाल्याने शेतकरी हैराण झाले होते. त्यात पावसाच्या लहरीपणामुळे शेतातील उभी पिके करपून जात असताना मंगळवारी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या पावसामुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, ऊस यासह सर्वच पिके शेतात आलेल्या पुरामुळे भुईसपाट झाली आहेत.
वसमत तालुक्यात झालेला पाऊस इतका मोठ्या प्रमाणात झाला की, आजही अनेक ठिकाणच्या शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झालेला आहे. हाता तोंडाला आलेली पिके काढण्याआधीच अशा पद्धतीने पाऊस झाल्याने उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वसमत तालुक्यातील शेकडो एकरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून, सरकारने मदतीची घोषणा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे, त्यांना विमा मंजूर करून नुकसानभरपाई देण्याची सुद्धा मागणी होत आहे.
हिंगोली जिल्ह्यात मंगळवारी परतीच्या पावसाने अनेक भागात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नद्या, नाल्यांना पुर आल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी तर थेट गावात पाणी शिरल्याची परिस्थिती दिसून आली. वसमत तालुक्यात बळेगाव, तसेच अन्य एका गावात शेजारी असलेल्या नाल्याचे पाणी शिरल्याने काही वेळ नागरिकांच्यात भीतीचे वातावरण होते. मात्र, पावसाचा वेग कमी झाल्यावर हळूहळू पाणी देखील ओसरत गेले. तर, दुसरीकडे हिंगोली शहरातील औंढा रोडवर असलेल्या संभाजी विद्यामंदिर परिसरात पावसाचे पाणी साचले होते. तसेच शहरातील एनटीसी भागातही मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागली. त्याचबरोबर काही शासकीय, निमशासकीय कार्यालयातही पावसाचे पाणी साचले होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर