माना, २१ सप्टेंबर २०२० : सोलापूर जिल्ह्यातील केळी निर्यातीसाठी सोलापूर जिल्ह्यात क्लस्टर निर्माण होणार असून याचा फायदा माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील निर्यातक्षम केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती आमदार बबनदादा शिंदे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,सोलापूर जिल्ह्यामध्ये माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम केळीचे उत्पादन घेतले जाते. सध्या आखाती देशातील सौदी, इराण , इराक , अफगाणिस्थान याचबरोबर रशिया आदी देशांमध्ये केळी निर्यात होत असून परकीय चलन मिळण्याच्या दृष्टीने हि महत्त्वाची बाब आहे.त्यामुळे जिल्ह्यात क्लस्टर निर्माण झाल्यास त्याचा फायदा केळी उत्पादकांना होणार आहे. कंपन्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणावर या क्षेत्रात संधी निर्माण होणार आहे. यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळेल त्यासाठी सोलापूर जिल्ह्यात केळी निर्यातीसाठी क्लस्टर निर्माण करण्यात यावे अशी मागणी कृषी विभाग व राज्याचे पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे करण्यात आली होती, दरम्यान याच विषयावर तारांकित प्रश्नही उपस्थित करण्यात आला होता त्यानुसार महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे यांच्यामार्फत माहिती देण्यात आलेली असून त्यांनी केंद्र शासनाच्या कृषी निर्यातवृद्धि करिता केंद्र सरकारमार्फत देशांमध्ये कृषी निर्माण धोरण जाहीर करण्यात आलेले आहे या धोरणांमध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये आंबा, द्राक्षे,केळी,संत्री,लिंबू, कांदा यासाठी ६ क्लस्टरचा समावेश करण्यात आलेला आहे आणि यामध्ये केळी पिकासाठी सोलापूर जिल्ह्याचा समावेश करण्यात आला असल्याचेही त्यांनी कळवले आहे.
सोलापूर जिल्ह्यामध्ये केळी क्लस्टर निर्मितीसाठी राज्य शासनाने सकारात्मक धोरण घेत केंद्र सरकारकडे निधीची तरतूद करून अपेडा या एजन्सीमार्फत व राज्य सरकार यांच्या सहयोगातून क्लस्टर सुरू करण्याची मागणी केली असल्याचे सांगत आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा,पंढरपूर, माळशिरस आणि करमाळा या तालुक्यातील केळी उत्पादकांना जास्तीत जास्त निर्यातक्षम केळी उत्पादन करण्यास चालना मिळेल त्यामुळे शेतकऱ्यांना जादा दर मिळण्यासाठी मदत होणार आहे असे सांगून केळी क्लस्टर मुळे परिसरातील शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना चांगला फायदा होणार असून परकीय चलन उपलब्ध होणार असल्याचेही आ. शिंदे यांनी याप्रसंगी सांगितले.
केळी निर्यातीसाठी सोलापूर जिल्ह्यात क्लस्टर निर्माण झाल्याने याचा फायदा जिल्ह्यातील केळी उत्पादकांना होणार असून मोठे शेतकरी स्वत:निर्यातदार होऊ शकतात. शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध होणार असून यातून केळीला चांगला दर मिळून केळी उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी-प्रदीप पाटील