जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय रुग्णालयांना भेटी देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई, ६ ऑक्टोबर २०२३ : राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महापालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीतील रुग्णालयांना तत्काळ भेट देऊन पाहणी करावी आणि सद्य स्थितीचा अहवाल सादर करावा, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, संभाजीनगर येथील घाटी आणि नागपूर जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूचा मुद्दा तापला असून राज्यातील अन्य रुग्णालयातील दुरवस्थेचा मुद्दाही चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधून राज्यातील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यापुढे जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे शासकीय रुग्णालयांना भेट देण्याच्या स्पष्ट सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

नांदेड घाटी येथील रुग्णालयांमध्ये झालेल्या मृत्यू प्रकरणांच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली असून अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी दिला आहे. औषध खरेदीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनाही अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे औषध खरेदीत विलंब होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा