Pimpri-Chinchwad Municipal Corporation Achievement: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने महाराष्ट्र शासनाच्या ‘राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान व स्पर्धा’ मध्ये ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मालमत्ता कर संकलन वाढीसाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण योजना,सुलभ ऑनलाइन सुविधा, प्रभावी मालमत्ता जप्ती लिलाव प्रक्रिया, अचूक जिओ सिक्वेन्सिंग आणि युनिक प्रॉपर्टी आयडेंटिफिकेशन कोड (यूपीआयसी) यांसारख्या उत्कृष्ट प्रयत्नांमुळे पालिकेने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या दैदीप्यमान यशाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी मुंबई येथे मानाचा पुरस्कार स्वीकारला.
या गौरवशाली सोहळ्याप्रसंगी राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यशदाचे अतिरिक्त महासंचालक राहुल महिवाल, प्रफुल्ल पुराणिक यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.
महानगरपालिकेने मालमत्ता कर संकलन प्रक्रियेत आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला. प्रशासनात अधिकाधिक पारदर्शकता आणली. नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आणि एक उत्कृष्ट कार्यप्रणाली विकसित केली. याच उत्कृष्टतेमुळे राज्यस्तरीय समितीने महापालिकेच्या प्रस्तावाची सखोल छाननी करून प्रथम क्रमांकासाठी निवड केली.
या पुरस्कारामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेला तब्बल १० लाख रुपयांचे पारितोषिक मिळाले आहे. सोमवारी मुंबईतील सह्याद्री राज्य अतिथिगृह येथे आयोजित नागरी सेवा दिन २०२५ आणि पारितोषिक वितरण समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आयुक्त शेखर सिंह यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या अभूतपूर्व यशानंतर आयुक्त शेखर सिंह यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केलेले अथक परिश्रम आणि नागरिकांचा आमच्यावर असलेला विश्वास व सहभाग हेच आमच्या यशाचे खरे गमक आहे.”
“कटिबद्ध जनहिताय” या ब्रीदवाक्याला अनुसरून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका नेहमीच कार्यरत असते. कर संकलन विभागाने दाखवलेली पारदर्शकता, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग, महिलांचा सक्रिय सहभाग आणि नागरिकांचे महत्त्वपूर्ण सहकार्य यांमुळे मालमत्ता कर व्यवस्थापनात एक क्रांती घडवून आणली आहे, असेही आयुक्तांनी नमूद केले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या या अद्वितीय कामगिरीमुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी, सोनाली तांबे














































