कोल्हापूर २८ एप्रिल २०२४ : कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विजयी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरवर विशेष लक्ष केंद्रित केलयं. काल शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार संजय मंडलिक यांना विजयी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका सुरू होत्या. कागलमधील भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे यांच्याबरोबर मुख्यमंत्र्यांनी बंद खोलीत चर्चा करुन कागलमधून संजय मंडलिक यांना सर्वाधिक मताधिक्य देण्यासाठी तयारी करण्यात आलीय.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या मध्ये काटे की टक्कर होणार आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह महायुतीच्या नेत्यांनी या मतदारसंघात प्रचारासाठी जोरदार कंबर कसल्याच दिसून येतयं. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी तर कोल्हापुरवर विशेष लक्ष केंद्रित केलयं. दरम्यान काल शनिवारी महायुतीच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांच्या आग्रहाखातर पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाविजय संकल्प सभा ही घेण्यात आली. या सभेनंतर रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी बैठका सुरू होत्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : श्रीकांत पाटील