मुख्यमंत्र्यांनी केली ‘मिसिंग’ लिंक बोगद्याची पाहणी, पुणे-मुंबई प्रवास होणार अर्ध्या तासाने कमी

पुणे, ११ डिसेंबर २०२०: पुणे-मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. पुणे-मुंबईमधील प्रवासाचे अंतर कापण्यास लागणारा वेळ आता कमी होणार आहे. हा वेळ सुमारे अर्ध्या तासाने कमी होणार आहे. त्यासाठी द्रुतगती महामार्गावरील सर्वांत अवघड टप्पा ठरणाऱ्या खंडाळा घाटमाथा परिसरात नव्या मार्गिका काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. आडोशी बोगद्याजवळ मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ एकत्र येतात आणि खंडाळा एक्झीट येथे वेगळे होतात. आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झीट या लांबीत घाट आणि चढ उताराचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे दरडी कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात वारंवार होत असतात. त्यामुळे मुंबईकडे येणारी डोंगरालगतची एक लेन ही पावसाळ्यात वाहतुकीसाठी बंद ठेवावी लागते. त्यातून वाहतूक कोंडी होते. यावर उपाय म्हणून हा प्रकल्प राबवला जात आहे. याठिकाणी असणाऱ्या बोगद्याचे काम २ किलोमीटरपर्यंत झाले आहे. या प्रकल्पाचे नाव ‘मिसिंग लिंक’ असे ठेवण्यात आले आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या (मिसिंग लिंक) प्रकल्पांचं काम सुरु आहे. या प्रकल्पाच्या पाहणीसाठी काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही प्रकल्पाला भेट दिली. या प्रकल्पाची एकूण लांबी १९.८० किलोमीटर असून या प्रकल्पांतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेंज या अस्तित्वातील ५.८६ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे ८ पदरीकरण करण्याचं काम सुरु आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, परिवहनमंत्री अनिल परब, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्यासह संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा