मुंबई, २८ जुलै २०२३: अतिवृष्टी, महापुर, दरड कोसळणे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या आपत्तीग्रस्तांना राज्य सरकारकडून मिळणाऱ्या मदतीत दुप्पटीने वाढ करण्यात आली आहे. आपत्तीग्रस्तांना आता १० हजार रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत बोलताना स्पष्ट केले आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना यापूर्वी पाच हजार रुपये इतकी नुकसान भरपाई म्हणजेच आर्थिक मदत राज्य सरकारकडून केली जात होती. त्यामध्ये वाढ करुन आता दहा हजार रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, पावसामुळे झालेल्या नुकसानीवर आज विधानसभेत चर्चा झाली.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी नैसर्गिक आपत्तीतील नुकसानग्रस्त आणि शेतकऱ्यांच्या हितासाठीचे काही निर्णय पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत आज मांडले होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही. पावसामुळे झालेल्या नुकसानीवर विधानसभेत झालेल्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्र्यांनी हे मत व्यक्त केलं.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर