सीएम शिंदे यांनी दिल्या सूचना, पीओपी गणेश मूर्तीवर बंदी नसुन त्या कृत्रिम तलावात विसर्जन कराव्यात

मुंबई, २७ जुलै २०२३ : संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत आता पीओपी मूर्तीवर बंदी आहे की नाही, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे, अशा परिस्थितीत आता प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यावर बंदी नाही, केवळ विसर्जनावर बंदी असल्याची बातमी समोर आली आहे. या मूर्तीचे विसर्जन नदी, समुद्र आणि तलावांमध्ये करू नये, तर कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींचे जलकुंभात विसर्जन करू नये, अशा सूचना दिल्याचे मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत सांगितले. जयंत पाटील यांनी यासंदर्भात एक सूचना केली होती. त्याला उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले, सार्वजनिक उत्सवांच्या काळात होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात बैठक घेऊन पर्यावरणपूरक सण साजरे करा अशा सूचना दिल्या आहेत.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तीकारांना महापालिकेने त्यांच्या भागातील प्रत्येक प्रभागात प्राधान्याने जागा उपलब्ध करून द्यावी, तसेच शक्य झाल्यास त्यांना काही प्रमाणात शाडू माती उपलब्ध करून दया, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीबाबत नागपूर खंडपीठात सुनावणी सुरू असल्यामुळे यावर आपण जास्त बोलू शकत नाही, असेही केसरकर यांनी स्पष्ट केले. आता बातमी अशी आहे की, पीओपीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करू शकता पण तिचे विसर्जन कृत्रिम तलावातच करू शकता.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा