मुंबई, २२ ऑगस्ट २०२३ : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना कांद्याच्या प्रश्नावर राजकारण न करण्याचे आवाहन केले. कांद्याच्या मुद्यावर कुणीही राजकारण करू नये. केंद्राने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही. त्यामुळेच या प्रकरणी तातडीने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले. या प्रकरणी सरकारवर टीका करणाऱ्या शरद पवारांना त्यांनी ते १० वर्षे देशाचे कृषिमंत्री होते, अशी आठवणही करून दिली आहे.
कांदा खरेदीच्या निर्णयासाठी पंतप्रधान मोदी तसेच अमित शाह आणि पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, ”देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन आणि धन्यवाद. त्याचबरोबर गृहमंत्री अमित शाह आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आभार. मानले आहेत दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा घेतलेला निर्णय ऐतिहासिक आहे. पहिल्यांदाच पूर्वनिर्धारित २४१० प्रति क्विंटल दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. गरज भासल्यास राज्याला पुन्हा मदत करण्यासाठी केंद्र सरकार तयार आहे, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मी देखील अमित शाह आणि पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. गरज पडल्यास केंद्राकडून आणखी सहकार्य मिळेल, अशी खात्री केंद्र सरकारनं दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कांद्याला ४ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याची मागणी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शरद पवार मोठे नेते आहेत. आता या विषयावर राजकारण न करता शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. शरद पवार केंद्रीय कृषीमंत्री होते. त्यावेळी सुद्धा अशी परिस्थिती निर्माण झालेली. पण त्यावेळी असा निर्णय का नाही झाला?. शेतकऱ्यांवर संकट आलं, तेव्हा पंतप्रधान, केंद्र सरकार पाठिशी उभे राहिले आहे. शरद पवारांच्या काळातही अशी परिस्थिती निर्माण झाली होती, तेव्हाही असा निर्णय सरकारने घेतला नव्हता. पण, आता मोदी सरकारने मदत केली. त्यामुळे यामध्ये राजकारण करु नये. केंद्र सरकारकारच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : वैभव शिरकुंडे