उत्तर भारतात थंडी-धुक्याचा दुहेरी हल्ला, जानेवारीत पावसाने मोडला 122 वर्षांचा विक्रम

North India Weather, 24 जानेवारी 2022: उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीमुळं जनजीवन कठीण झालंय. डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत आहे, तर मैदानी राज्यांमध्ये पाऊस आणि थंड वाऱ्यामुळं समस्या वाढल्या आहेत. जानेवारीच्या थंडीत पावसाळ्यासारखा पाऊस पडतोय. पाऊस आणि दाट ढगांमुळं सूर्याचं दर्शन दुर्लभ झालं आहे. दरम्यान, हवामान खात्याने (IMD) थंडीपासून अद्याप कोणताही दिलासा न मिळाल्याचा इशारा दिलाय.

IMD च्या म्हणण्यानुसार, थंडी आणि धुकं असा दुहेरी त्रास सहन करावा लागणार आहे. हवामान खात्याने सांगितलं की, जानेवारी 2022 मध्ये एवढा पाऊस झाला की, 122 वर्षांचा विक्रम मोडला गेला. दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये थंडीपासून सध्यातरी पुढील काही दिवस आराम मिळणार नाही, असा इशारा हवामान खात्याने (IMD) दिलाय.

पावसाने 122 वर्षांचा मोडला विक्रम

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, जानेवारीच्या पावसाने 122 वर्षांचा विक्रम मोडलाय. यापूर्वी 1995 आणि 1989 मध्ये असा पाऊस जानेवारीत दिसला होता. हवामानशास्त्रज्ञ आरके जीनामनी यांनी सांगितलं की, जानेवारी 2022 च्या पावसानं 122 वर्षांचा विक्रम मोडला आहे कारण जानेवारीमध्ये आतापर्यंत 88 मिमी पाऊस पडला आहे, जो 1901 नंतरच्या सध्याच्या हवामान डेटाबेसमध्ये सर्वाधिक आहे.

  • 1995 मध्ये जानेवारी महिन्यात 69 मिमी पाऊस झाला होता.
  • 1989 मध्ये एकूण 79 मिमी पाऊस पडला होता.

हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानला थंडी आणि धुक्याच्या दुहेरी त्रासाचा सामना करावा लागणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 24 आणि 25 जानेवारीला थंडीबरोबरच दाट धुकंही त्रासदायक ठरंल. त्याचबरोबर 26 जानेवारीपासून शीतलहरीचा इशाराही जारी करण्यात आलाय.

उत्तर प्रदेशात पावसामुळं वाढली थंडी

उत्तर प्रदेशात दोन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. हवामान खात्याने (IMD) पुढील दोन दिवस पावसाचा इशारा देऊन अनेक भागात गारपीट होण्याची शक्यता व्यक्त केलीय. लखनौ, लखीमपूर, बहराइच, मेरठ आणि मुझफ्फरनगरमध्ये पावसामुळं दिवसाचं तापमान 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदवलं गेलं.

त्याचवेळी रामपूर, बरेली आणि पिलीभीतमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामानाच्या अंदाजानुसार, 30 जानेवारीपर्यंत उत्तर प्रदेशात सतत थंडी राहील आणि पुढील दोन दिवस पाऊस पडत राहील.

उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा इशारा

उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीचा कालावधी अद्याप थांबलेला दिसत नाही. पुढील 3 दिवस मुसळधार हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. संपूर्ण राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मैदानी भागात सतत पाऊस पडत आहे. त्याचबरोबर डोंगराळ भागात आतापर्यंत 4 फुटांपर्यंत बर्फवृष्टी झालीय.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा