पुणे दिनांक २३।०१।२०२५ : राज्यातील थंडीने आता कहर केला आहे. वाढत्या गारठ्यामुळे नागरिकांना थंडीचा चांगलाच अनुभव येत आहे. राज्यातील किमान तापमानाचा पारा कमालीचा घसरला असून, अहमदनगर येथे १०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, जे राज्यातील सर्वांत कमी आहे. पुण्यात पारा १२.७ अंशांवर घसरला असून, सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.तज्ज्ञांच्या मते, पुढील दोन दिवसांमध्ये थंडी काहीशी कमी होण्याची शक्यता असून काही भागांत ढगाळ वातावरण राहील. उत्तर भारतातील हवामानातील चढ-उतारांचा परिणाम महाराष्ट्राच्या तापमानावर दिसून येत आहे. राजस्थान आणि त्याच्या आसपास चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार झाल्यामुळे पश्चिमी चक्रवातांची तीव्रता वाढत आहे. यामुळे तापमानामध्ये सातत्याने चढ-उतार होत आहेत.
राज्यभर थंडीचे कहर
राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडीची तीव्रता अधिक जाणवते. काही ठिकाणी तापमान १० अंशांच्या खाली घसरले आहे. जळगाव, नाशिक, यवतमाळ, नागपूर आणि परभणी येथेही गारठा चांगलाच जाणवला आहे. दुसरीकडे, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, मुंबई, तसेच महाबळेश्वरसारख्या ठिकाणी तुलनेने थंडी सौम्य आहे. मात्र, दुपारी उन्हाचा चटका काहीसा कमी होत आहे, ज्यामुळे नागरिकांना दिलासा मिळतो
पुण्यातील थंडीचा जोर
पुणे शहरात सध्या थंडीचा जोर वाढलेला असून नागरिक सकाळी आणि रात्री गारठलेल्या वातावरणाचा अनुभव घेत आहेत. दुपारच्या वेळेस सौम्य उष्णतेमुळे काहीसा दिलासा मिळत आहे, मात्र थंडीची तीव्रता कायम आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्यांनी उबदार कपड्यांचा वापर करण्याचे तज्ज्ञांनी सुचवले आहे.
राज्यातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
नगर: १०.५ पुणे: १२.७ नाशिक: १२.३ जळगाव: १२.७ नागपूर: १२.२ परभणी: १२.४ सोलापूर: १५.९
कोल्हापूर: १८.३ मुंबई: २१.० महाबळेश्वर: १४.६
सध्याच्या बदलत्या हवामानामुळे राज्यात थंडी आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी आणि गारठ्याचा आनंद घेत थंडीचे स्वागत करावे.
न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे