भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा आज ८५ वा वाढदिवस आहे. देशाच्या १२ व्या राष्ट्रपती राहिलेल्या प्रतिभाताई यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त उलगडला त्यांचा जीवनप्रवास…
प्रतिभाताई पाटील यांचा जन्म १९ डिसेंबर १९३४ मध्ये झाला. प्रतिभाताई पाटील यांनी राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. एलएलबी केल्यानंतर त्यांनी वकिलीस प्रारंभ केला. त्याच काळात महिलांच्या सामाजिक प्रश्नांमध्ये त्या लक्ष घालू लागल्या आणि त्यानंतर त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली.
प्रतिभाताई उत्कृष्ट टेबल टेनिसपटू आहेत. त्यांनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पर्धांमध्ये अनेक बक्षीसे जिंकली आहेत. एम. जे.महाविद्यालयात शिकत असताना त्यांनी ‘कॉलेज क्वीन’ चा किताबही पटकावला होता.
साठच्या दशकात राजकारणात आलेल्या प्रतिभाताईंनी काँग्रेसच्या तिकीटावर १९६२ मध्ये वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी जळगावमधून विधानसभेची निवडणूक लढवली आणि यशही मिळविले.
त्यानंतर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून त्या १९६७ ते १९८५ पर्यंत चारवेळा निवडून आल्या. १९८५ ते १९९० पर्यंत त्यांनी राज्यसभेच्या सदस्या म्हणून काम पाहिलं.
२००४ मध्ये त्यांची राजस्थानच्या २४ व्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली.
विशेष म्हणजे राज्यपाल बनणाऱ्याही त्या देशातील पहिल्या महिला आहेत. प्रतिभाताई या भारतीय प्रजासत्ताकाच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. माजी राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर २५ जुलै २००७ रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली होती.
एक दयाळू राष्ट्रपती म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. तर त्यांनी राष्ट्रपती काळात अनेक गुन्हेगारांचे दयेचे अर्ज स्वीकारले होते. त्यांनी २३ जणांची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेवर आणली. राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे. त्यांनी श्रम साधना ट्रस्टचीही स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून नोकरदार महिलांसाठी नवी दिल्ली, मुंबई आणि पुण्यात वस्तीगृहांची स्थापना केली.
जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत की ज्यांनी एकही निवडणूक हरली नाही. तसेच त्या जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत कि ज्यांनी आपल्या राष्ट्रपती कार्यकाळात एक सुखोई सारखे लढाऊ विमान चालवले. ते पण वयाच्या ७४ व्या वर्षी. देशाच्या सर्वोच्च पदावर महिला जावी हे राष्ट्रपिता महात्मा गांधींचे स्वप्न प्रतिभाताई याने खरे करवून दाखवले. अशा प्रतिभावान व्यक्तिमत्वाला “न्युज अनकट” कडून वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा!